डीजी रश्मी शुक्लाही केंद्रात प्रतिनियुक्तीवर बनणार सीआरपीएफच्या एडीजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:17 PM2021-02-08T17:17:40+5:302021-02-08T17:19:27+5:30
IPS Rashmi Shukla : दीड महिन्यात २ डीजीनी सोडले महाराष्ट्र
मुंबई - नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अप्पर महासंचालक म्हणून केंद्रीय गृह विभागाने त्यांची नियुक्ती केली असून त्यांना नवीन पदासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.
गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शुक्ला या दुसऱ्या अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आहेत.
गतवर्षाच्या अखेरीस तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) प्रमुख म्हणून निवड झाली आहे.
रश्मी शुक्ला या १९८८च्या आयपीएस बँचच्या अधिकारी आहेत. राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी त्यांची पदोन्नतीवर नागरी संरक्षण विभागात बदली केली होती. त्यांच्यासाठी गृहरक्षक दलाशी संलग्न असलेला विभाग स्वतंत्र केला होता. मात्र तुलनेत कमी महत्वाचे पद असल्याने त्यांना त्याठिकाणी काम करण्यात फारसे स्वारस्य नव्हते.त्यामुळे त्यांनी निवृत्तीपर्यत म्हणजे ३० जून २०२४ पर्यत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून निवड pic.twitter.com/KVHSBsCbtm
— Lokmat (@MiLOKMAT) February 8, 2021
रश्मी शुक्ला या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी समजल्या जातात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना 'साईड पोस्टिंग' दिली होती. सरकारशी त्याचे फारसे पटत नसल्याने त्यांनीही जायसवाल यांच्या प्रमाणे केंद्रात जाण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून एक दर्जा कमी असलेले 'एडीजी' पद स्वीकारले आहे.