गळ्याला कोयता लावून तरुणाची लूट करणाऱ्या दोघांना धुळे एलसीबीने ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 08:03 PM2023-03-10T20:03:31+5:302023-03-10T20:03:40+5:30
Crime News : पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कुसूंबा गावात घरफोडी चोरी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
धुळे शहरातील वर्दळीच्या बारापत्थर चौकात भर सायंकाळी गळ्याला कोयता लावून तरुणाला लुटीसह घरफोडी करून पळून जाणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकीसह एक लाखाचा रोख मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देत एलसीबीच्या पथकाचे कौतुक केले.
धुळे तालुक्यातील बिलाडी येथील रहिवासी दीपक शिवलाल अहिरे (वय ३३) हा काल सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बारापत्थर चौकातील जियाभाई यांच्या मोटर सायकलीच्या गॅरेजवर उभा होता. तेव्हा अकबर जलेला (रा. पुर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) व त्याचा साथीदाराने कारण नसताना त्यास शिवीगाळ करुन कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील १० हजार रूपये रोख व उजव्या हातातील चांदीचे ब्रासलेट तसेच एक मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता. याबाबत दीपक अहिरे यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घडलेला गुन्हा हा अतिशय गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सादर घटनेची तातडीने दखल घेत आरोपीतांचा तत्काळ शोध घेऊन कारवाईचे आदेश धुळे एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले होते. त्यानुसार गुन्हयाचा समांतर तपास सुरु असतांना अकबर जलेला व त्याचा साथीदार हे धुळे - सुरत महामार्गावर कुसूंबा गावा जवळ असलेल्या हॉटेल कलकत्ता पंजाब येथे उभे आहेत, अशी गोपनीय माहिती निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ पथकाला रवाना केले. धुळे एलसीबीच्या पथकाला तेथे दोन जण सुरतकडे जाणाऱ्या गाड्यांना हात देत असल्याचे दिसले. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाठलाग केला असता दोघांना पकडले. अकबर अली केसर अली शाह व नईम इसाक पिंजारी असी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कुसूंबा गावात घरफोडी चोरी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्याकडून ५० हजारांची दुचाकी, ७ हजार ८३० रूपयांची रोकड, १५ हजारांचे तीन मोबाईल, १५ हजारांचा साडे तीन ग्रॅमचा एक पिवळ्या धातूचा नेकलेस, १८ ग्रॅमची ६ हजारांची धातूची रिंग, ६ हजार ४०० रूपयांचे ९९ ग्रॅमचे पांढऱ्या धातुचे ब्रासलेट, लोखंडी जॅक, चार फुटांची टॅमी असा एकूण १ लाख १ हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांकडून धुळे शहर व तालुका पोलिसात दाखल दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, अकबर अली केसर अली शाह याच्यावर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात ४, साक्री २ व आझादगनर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे. दोघा आरोपींना मुद्देमालासह गुन्ह्याचे पुढील तपासासाठी धुळे शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि प्रकाश पाटील, पोहेकॉ अशोक पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे यांच्या पथकाने केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.