हिरा ग्रुपने गुंतवणूकदारांना लावला ५०० कोटींना चुना, आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 06:28 PM2018-10-24T18:28:23+5:302018-10-24T18:31:53+5:30
मुंबईत १ हजाराहून अधिक नागरिकांनी हिरा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या पूर्वी नौहिरा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा हैद्राबाद येथे नोंदवण्यात आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत.
मुंबई - विविध राज्यातील नागरिकांची जवळजवळ ५०० कोटी रुपयांना फसवणूक करणाऱ्या हिरा ग्रुपच्या संचालिका नौहिरा शेख यांच्या विरोधात अखेर आज गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जे. जे. मार्ग पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना तसूभर दिलासा मिळाला आहे. मुंबईत १ हजाराहून अधिक नागरिकांनी हिरा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. या पूर्वी नौहिरा यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा हैद्राबाद येथे नोंदवण्यात आला आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदयाचे लोक आहेत.
मुस्लिम धर्मात बॅकेत पैसे ठेवणं आणि त्याचं व्याज घेणं हे अमान्य आहे. याच संधीचा फायदा घेऊऩ नौहिरा याने २००८ मध्ये हिरा ग्रुप कंपनीची स्थापना केली. या ग्रुपच्या हीरा गोल्ड एक्झिम लि., हीरा रिटेल प्रा. लि., हीरा टेक्सटाईल लि., हीरा फ़ुटेक्स लि. आदी २० हून अधिक कंपन्या आहेत. त्यानंतर नौहिराने कंपनीतील व्याजऐवजी नफ्याचा वाटा देण्याच्या नावाखाली लाखो मुस्लिम नागरिकांना पैसे गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर देशातील विविध राज्यासह आखाती देशातील मुस्लिम नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात लाखो रुपये गुंतवले. त्यानुसार पहिले वर्षभर सर्वांना व्यवस्थित कंपनीकडून मोबदला देऊन विश्वास संपादन करून नौहिरा पसार झाली. तसेच नोटबंदीनंतर कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांना आर्थिक मोबदला दिला नाही.
मागील सहा महिन्यांपासून अनेकांना पैसे येणे बंद झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी पुढे येऊन आवाज उठवला. या प्रकरणी पहिला गुन्हा हा हैद्राबादमध्ये कंपनीविरोधात नोंदवला गेला. या गुंतवणूकदारांमध्ये मुंबईतील एक हजाहून अधिक नागरिकांनी पैसे गुंतवले होते. त्यातील जे.जे.मार्ग पोलिस ठाणे येथे एका बुट विक्रेत्याने मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते. काही दिवस मोबदला मिळाला. मात्र नंतर जून २०१८ पासून मोबदला मिळणं बंद झाल्याने त्याने जे.जे.मार्ग पोलीस ठाण्यात कंपनीची संचालिका नौहिरा शेख हिच्याविरोधात गुन्हा नोंदवला. हा गुन्हा हीरा ग्रुपच्या संचालिका नौहिरा शेख आणि पणन अधिकारी सलिम अन्सारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने देखील गुन्हा दाखल करून घेतला असून तपास देखील या शाखेचे पथक करणार आहे.