दृश्यम चित्रपटाच्या धर्तीवर लावली मृतदेहाची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:54 PM2020-02-03T23:54:08+5:302020-02-04T00:00:14+5:30
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या युवकाचा खून करून बाईकसह मृतदेह १० फूट खड्ड्यात पुरल्याची घटना अजय देवगन आणि तब्बू यांच्या दृश्यम चित्रपटाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या युवकाचा खून करून बाईकसह मृतदेह १० फूट खड्ड्यात पुरल्याची घटना अजय देवगन आणि तब्बू यांच्या दृश्यम चित्रपटाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. आरोपींना कोणतेच सुगावे सोडले नाहीत. तरीसुद्धा पोलिसांनी त्यांचा छडा लावला. परंतु प्रकरणाच्या तपासात बाधा उत्पन्न करण्यासाठी आरोपींनी सोमवारी न्यायालयात त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. पोलीस रात्री उशिरापर्यंत आरोपींची वैद्यकीय तपासणी करीत होते.
गुन्हे शाखा पोलिसांनी वर्धा येथील रहिवासी पंकज गिरमकर (३२) याच्या खुनाचा उलगडा महिनाभरानंतर करून सूत्रधार अमरसिंह उर्फ लल्लू ठाकुर, त्याचे साथीदार मनोज उर्फ मुन्ना तिवारी आणि शुभम उर्फ तुषार डोंगरेला अटक केली. अमरसिंहचे पंकजच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळताच पंकज नागपूर सोडून वर्ध्याला आपल्या गावी गेला. त्यानंतरही अमर पंकजच्या पत्नीच्या संपर्कात होता. २८ डिसेंबरला पंकज अमरसिंहला समजविण्यासाठी त्याच्या कापसी येथील धाब्यावर गेला. तेथे घणाने त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. खुनानंतर जेसीबीच्या साह्याने १० फुटांचा खड्डा करून पंकजचा मृतदेह बाईकसह त्यात पुरला. त्याने दृश्यम चित्रपटाप्रमाणे पंकजचा मोबाईल कापसीत उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये फेकून दिला. पंकज बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी धंतोली पोलिसात दिली. पोलिसांनी मोबाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ट्रकमध्ये मोबाईल फेकला तो राजस्थानला गेला होता. त्यामुळे मोबाईलचे लोकेशन राजस्थान असल्याचे समजले. त्यामुळे पंकज राजस्थानला गेल्याची शंका आली. दरम्यान, पोलिसांना पंकजचा खून झाल्याचे समजले. तो बेपत्ता झाल्यावरही पत्नीच्या स्वभावात बदल झाला नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी अमरच्या धाब्यावर पाळत ठेवणे सुरू केले. आठवडाभर निरीक्षण केल्यावर या खुनाचा उलगडा झाला. चौकशीत पोलिसांनी आरोपींना चित्रपटाच्या धर्तीवर योजना आखली काय, अशी विचारणा केली असता आरोपींनी त्याचा इन्कार केला. त्यांच्या मते धाब्यावरून मृतदेह दुसरीकडे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तेथेच मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला. अमरचा साथीदार शुभम कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला पोलीस मोबाईल लोकेशनवरून तपासाची दिशा ठरवित असल्याचे माहीत होते. त्यामुळे त्यांनी मोबाईल ट्रकमध्ये फेकला. त्यांना सीडीआर पाहून पोलीस दिशाहीन होतील हे माहीत होते. पोलिसांनी खड्डा खोदून रविवारी पंकजचा मृतदेह आणि दुचाकी बाहेर काढली. मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला. वर्ध्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.