लोकमत न्युज नेटवर्क धनज बु. (वाशिम): शेताच्या बांधावर असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादात एकाची हत्या, तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम सिरसोली येथे २४ जून रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून धनज बु. पोलिसांनी चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी आनंदा महादेव घाटे (६६, रा. सिरसोली, ता. कारंजा) यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की. फिर्यादीने बटईने केलेल्या शेतजमिनीच्या धुºयावरील झाडाच्या फांद्या तोडल्यावरून आरोपी अंकुश गजानन सुलताने, मनिष गजानन सुलताने, गजानन भिमराव सुलताने व प्रमिला गजानन सुलताने सर्व रा. सिरसोली यांनी फिर्यादीशी वाद घातला. त्यावेळी फिर्यादीचा जावई ईश्वरदास जानराव महिंगे (४०, रा. फुलामला, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) यांनी आरोपी व फिर्यादीची समजूत काढून वाद घालू नका, असे सांगितले. त्यावेळी आरोपी प्रमिला सुलताने हिने हा ईश्वरदास आपल्या भांडणात का आला, याला जिवे मारून टाका, असे तिच्या मुलांना म्हटले. त्यानंतर आरोपी अंकूश सुलताने याने ईश्वरदास महिंगे यांच्या पोटात गुप्ती भोसकली, तर मनिष सुलताने याने ईश्वरदास महिंगे यांच्या पाठीत चाकू भोसकला, तसेच प्रमिला सुलताने हिने ईश्वरदास महिंगे यांच्या डोक्यावर दगड मारला. त्यात ईश्वरदास महिंगे यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच दरम्यान आरोपी गजानन सुलताने याने फिर्यादी आनंदा महादेव घाटे, शकुंतला घाटे व सुनंदा घाटे यांच्या डोक्यावर भाल्याने वार करून जखमी केले, तर अंकूश सुलताने यांनी मृतक ईश्वरदास महिंगे यांचा मुलगा अक्षय महिंगे यालाही गुप्ती मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी या चौघांवर धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथील ईर्विन रुग्णालयात हलविले, तसेच आरोपी अंकूश गजानन सुलताने, मनिष गजानन सुलताने, गजानन भिमराव सुलताने व प्रमिला गजानन सुलताने या चौघांवर कलम ३०२, ३०७, ३२६, ५०४, ३४, भादंवि सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे.
शेताच्या बांधावरील झाडाच्या फांद्या तोडण्यावरून वाद; एकाची हत्या, चार जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 1:24 PM
झाडाच्या फांद्या तोडण्यावरून झालेल्या वादात एकाची हत्या, तर चार जण गंभीर जखमी झाले.
ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील सिरसोली येथील घटना गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे.