सहा महिन्यात रक्कम दुप्पट : बालाघाटमधील ठगबाजाचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 10:31 PM2020-02-27T22:31:58+5:302020-02-27T22:33:33+5:30
शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सहा महिन्यात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवत बालाघाटमधील एका ठगबाजाने विदर्भातील अनेकांना लाखोंचा गंडा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सहा महिन्यात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवत बालाघाटमधील एका ठगबाजाने विदर्भातील अनेकांना लाखोंचा गंडा घातला. वर्धा जिल्ह्यातील एका पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर या खळबळजनक प्रकरणाचा बोभाटा झाला असून अजनी पोलिसांनी बुधवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
राहुल रामप्रसाद पटेल (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. तो कन्हार टोला, लालपूर बालाघाट ( मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. वर्धा जिल्ह्यातील मांडगाव येथील मूळ निवासी असलेले वरुण दिलीप वखरे (वय २८) गेल्या काही दिवसांपासून चंदननगरात राहतात. २०१७ मध्ये वरुणसोबत आरोपी पटेलची एका सेमिनारमध्ये ओळख झाली होती. आरोपीने त्यानंतर वरुणसोबत संपर्क वाढवला. आपण शेअर ट्रेडिंग करतो. आपली फ्रेन्चाईजी असून, अनेक मोठमोठ्या कंपन्यात तसेच त्यांचे वरिष्ठ आपल्या संपर्कात आहेत. आपल्या मार्फत विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये रक्कम गुंतविल्यास सहा महिन्यात दुप्पट रक्कम मिळते, अशी थाप मारली. आपण अनेकांना अल्पावधीतच मालामाल बनविले असून, अजूनही कित्येक जण आपल्याकडूनच शेअर ट्रेडिंग करतात, असेही सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून वरुण आणि त्याच्या सोबतच्यांनी १६ आॅक्टोबर २०१७ पासून आरोपी पटेलकडे रक्कम देणे सुरू केले. इकडे गुंतविली, तिकडे गुंतविली, अशी थाप मारून आरोपी काही महिने त्यांच्याशी बनवाबनवी करीत होता. १३ जुलै २०१८ पर्यंत वरुण तसेच अन्य काही जणांनी ९ लाख, ७ हजार रुपये पटेलकडे दिले. मात्र, त्याचा परतावा काही मिळेना. त्यामुळे वरुण आणि संबंधितांनी त्याच्याकडे आपल्या रकमेसाठी तगादा लावला. आरोपींनी बरीच टाळाटाळ केल्यानंतर त्यांना अलिकडे प्रतिसाद देणे बंद केले. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे पीडितांनी अजनी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणी आरोपी पटेलविरुद्ध बुधवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
पीडितांची संख्या शेकडोंच्या घरात
आरोपी पटेल त्याच्या जाळ्यात पीडितांना अडकवण्यासाठी मोठमोठ्या हॉटेलमध्ये सेमिनारच्या निमित्ताने गोळा करायचा. आलिशान कार घेऊन तो नागपुरातील अजनी परिसरात यायचा. सहा महिन्यात रक्कम दामदुप्पट करा अन् ऐशोआरामात जगा, असे म्हणून तो जाळ्यात अडकलेल्यांकडून लाखोंच्या रकमा घेत होता. त्याची चमकदमक पाहून अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी त्याच्या हवाली केली. बुधवारी दाखल झालेल्या पीडितांची संख्या पाच ते सात असली तरी प्रत्यक्षात ठगबाज पटेलच्या जाळ्यात शेकडो जण अडकल्याचा संशय आहे.