चांदूर बाजार (अमरावती) : तारुण्यात येताच दोघांचे प्रेम जुळले. प्रेमाला घरच्यांचा विरोध. परंतु विरोधाला न जुमानता दोघेही विवाह न करताच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती- पत्नीप्रमाणे राहायला लागले. हे युवतीकडील मंडळींना आवडले नाही. यातून झालेल्या वादात कथित जावायाने व्हॅलेंटाईन डे‘ ला सासऱ्याची व मेहुण्याची धारदार शस्त्राने हत्या केली. यात कथित जावायाचा आजे सासरेही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली.ही घटना तालुक्यातील कुरळपूर्णा येथे, रविवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. घटनेनंतर प्रकरणातील आरोपी रवि सुरेश पर्वतकर (२३, रा. महाविर काॅलनी अमरावती) हा आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपमधील पत्नीला घेऊन फरार झाला. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.प्राप्त माहितीनुसार, सदर प्रकरणातील आरोपी व त्याची कथित पत्नी हे दोघेही अमरावती येथे राहत होते. तेथे राहत असतानाच दोघांचेही प्रेम जुळले. लग्नाच्या आणा-भाका झाल्या. परंतु दोघांचा समाज भिन्न असल्याने युवतीच्या घरच्यांनकडून लग्नाला विरोध झाला. यामुळे दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही सज्ञान असल्यामुळे कायद्यानुसार कोणालाही विरोध करता आला नाही. परंतु युवतीच्या घरच्यांकडून या दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न होतच राहिला. काही दिवसांनंतर युवती कडील मंडळींनी युवतीला आपल्या घरी कुरळ पूर्णा येथे घेऊन आले. त्यानंतर सदर तिच्या घरच्यांंनी परत आरोपीकडे जाऊ दिले नाही.
तसेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कथित पती-पत्नीची सोडचिठ्ठी घेण्याची तयारी युवतीकडील म़डळींनी केली. दरम्यान व्हॅलेंटाईन डे ला प्रकरणातील आरोपी कथित पत्नीला घ्यायला कुरळपूर्णा येथे आला. यावेळी युवतीकडील मंडळींनी आरोपीला, आधीच लिहून ठेवलेल्या घटोस्फोटाच्या मुद्रांकावर स्वाक्षरीसाठी दबाव आणला. परंतु दबाला बळी न पडता आरोपीकथित पत्नीला बळजबरीने घेऊन जाण्यास निघाला. दरम्यान आरोपी व युवतीकडील मंडळीमध्ये वाद झाला. या वादानंतर ही आरोपीने युवतीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याने युवतीचे आजोबा, वडील व भाऊ हे तिघे मोटर सायकलला थांबवायला आडवे आले. दरम्यान आरोपी व युवतीकडील तिघांमध्ये जुंपली. यावरून आरोपीने आपल्याजवळील धारदार शस्त्राने (चाकूने) तिघांवर हल्ला चढविला. यात युवतीचे वडील बंडू साबळे, भाऊ धनंजय साबळे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आजोबा विश्वनाथ साबळे हे गंभीर जखमी झाले. अशा स्थितीत संधीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून आरोपी कथित पत्नीला (२२) ला घेऊन दुचाकी क्रमांक एएमच २७- बीयू-१८६६ वरून फरार झाला. याप्रकरणी मयत बंडू साबळे यांची पत्नी मीरा साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांदूरबाजार पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३६४ अन्वये गुन्हा नोंदविला. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. तसेच सदर आरोपी कुणालाही आढळल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले.