ATM कॅश व्हॅन ड्रायव्हरने पळवली; ४ कोटी घेऊन झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 04:52 PM2020-11-14T16:52:33+5:302020-11-14T16:53:11+5:30
Robbery : ही कॅशव्हॅन गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील निर्जनस्थळी पोलिसांना सापडली असून यातील रोख रक्कम मात्र आढळली नाही.
कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. या वाहनात सव्वा चार करोड रुपये असून अर्नाळा पोलिसांनी नोकराने चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कॅशव्हॅन गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील निर्जनस्थळी पोलिसांना सापडली असून यातील रोख रक्कम मात्र आढळली नाही.
विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅनच आरोपी ड्रायव्हरने गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. रायडर कंपनीचे कंत्राट असलेल्या कॅशव्हॅनमध्ये 4 करोड 58 लाख रुपयांची रोख रक्कम होती. त्यातील आजूबाजूच्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरण्यात आले होते व सव्वा चार करोड रुपये गाडीत होते. संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅशव्हॅन आली. गाडीतील लोडर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर ड्रायव्हर आरोपी कॅशव्हॅनसह पळून गेला आहे. एम एच 43 बीपी 4976 ह्या नंबरची कॅशव्हॅन भिवंडी तालुक्यातील निर्जळस्थळी पोलिसांना सापडली आहे. यातील चोरीचे सव्वा चार करोड रुपये चोरी करून आरोपी पसार झाले आहे. आरोपीला पकडण्यासाठी वसईचे क्राईम ब्राँचची टीम, ठाणे येथील क्राईम टीम अश्या तीन टीम बनवल्या असून तपास करत आहे. सदर आरोपी ड्रायव्हरची ओळख, घराचा पत्ता, कागदपत्रे पोलिसांना सापडली असून लवकरच आरोपी सापडला जाईल असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लोकमतजवळ व्यक्त केला आहे. सापडलेली गाडी अद्याप अर्नाळा पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत आणलेली नाही.