मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने मीरारोड मधून ३५ लाख रुपये किमतीच्या मेफेड्रॉन ह्या अमली पदार्थांच्या साठ्यासह दोघांना अटक केली आहे.
पोलीस आयुक्त सदानंद दाते व अपर पोलीस आयुक्त विजयकांत सागर, उपायुक्त (गुन्हे ) ह्यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या पथकाने अमली पदार्थ विरोधी हि कारवाई केली आहे . मध्यवर्ती युनिटचे मते, पाटील व केंद्रे ह्यांनी सोमवारी डेल्टा गार्डन येथील चौका जवळून दोघा आरोपीना ताब्यात घेतले . दोघेही सांताक्रूझच्या गोळीबार भागातील पॅरामाऊंट सोसायटीतील राहणारे आहेत.
एक आरोपीचे वय २० वर्षे असून त्याच्या कडून २० लाख किमतीचे २०० ग्रॅम एमडी तर दुसऱ्या १९ वर्षीय आरोपीकडून १५ लाख किमतीचे १५० ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले आहे. ह्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख पुढील तपास करत आहेत.