मद्यपीने तरुणीला इशारा केला अन् नागरिकांनी धू... धू... धुतले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 08:35 PM2020-11-19T20:35:30+5:302020-11-19T20:38:26+5:30
Crime News : बेंडाळे महाविद्यालयाजवळील घटना : सततच्या प्रकाराने विद्यार्थिनी त्रस्त
जळगाव : बेंडाळे महाविद्यालयाच्या परिसरात दुचाकीवर थांबलेल्या तरुणीला मद्यपी तरुणाने इशारा केला अन् त्याच्यावर क्षणातच पब्लीक मार पडला. पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणले. भारत नानकराम रामचंदानी (रा.सिंधी कॉलनी) असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता ही घटना घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील १८ वर्षीय तरुणी गुरुवारी दुपारी दुचाकीने गावात आली होती. बेंडाळे महाविद्यालयाजवळ थांबली असता, तेथे समोरच भारत रामचंदानी हा दुचाकीवर थांबलेला होता. मद्याच्या नशेत तर्रर असलेल्या भारत याने तरुणीला लांबूनच इशारा केला. एक वेळा दुर्लक्ष केल्यानंतरही त्याने हा प्रकार सुरुच ठेवल्याने तरुणीने वडील व नातेवाईकांना फोन करुन तेथे असलेल्या लोकांना सांगितला. तरुणीने त्याच्या कानाखाली लगावताच त्याच्यावर पब्लीक मार पडला. त्याचवेळी निर्भया व शहर पोलीस ठाण्याचे वाहन या भागात आले. शहर पोलिसांनी त्याला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याच्याही पालकांना बोलावण्यात आले. तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, बेंडाळे महाविद्यालयाच्या बाहेर टवाळखोर मुले नेहमीच थांबून विद्यार्थिनींची छेड काढत असतात, तर काही रिक्षा चालकांकडूनही असा प्रकार केला जातो. भीतीपोटी विद्यार्थीनी हा प्रकार सांगत नाहीत. काही तरुण तर तरुणींचा घरापर्यंत पाठलाग करतात तसेच शिट्या वाजवून इशारा करतात. भरदिवसा जळगाव शहरात असा प्रकार होत असल्याने आमच्या मुली सुरक्षित आहेत कशावरुन असा संतप्त सवाल या घटनेतील तरुणीच्या वडीलांनी पोलिसांकडे केला.