कल्याण - वालधुनीमधल्या आंबेडकर चौकात केमिकल टँकरचं झाकण अचानक उघडल्यानं केमिकल पडून बाजूनं दुचाकीवरून प्रवास करणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालं आहे. रविवारी रात्री कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारं साळसकर दाम्पत्य खरेदी करुन घरी जात असताना हा प्रकार घडला.
कल्याण पश्चिमेतील वालधुनी येथील आंबेडकर चौकात रस्त्यावर जाणाऱ्या एका केमिकल टँकरचे झाकण अचानक लीक झाल्याने टँकरच्या बाजूने दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्यावर केमिकल पडल्याने तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पत्नी गौरीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर केमिकल पडल्याने ती भाजली आहे. तर पती गौरेश यांच्या डोळ्यात केमिकल गेल्याने एका डोळ्याने त्यांना दिसत नसल्याने त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीड वर्षाचा मुलगा तनिष किरकोळ जखमी आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अज्ञात टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. रविवारी रात्री कल्याण मधून शॉपिंग करून साळसकर दांपत्य कल्याण पूर्वेतील आपल्या घरी चालले होते तेव्हा ही घटना घडली. दरम्यान एवढी गंभीर घटना घडून सुद्धा अद्यापही टँकर चालकाचा शोध न लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.