डोंबिवली - येथील पुर्वेकडील लोढा हेरीटेज मधील नवनीत नगर कॉम्प्लेक्समध्ये राहणा-या हितेन गोगरी यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 20 एप्रिलला घडली होती. वडीलांना कोरोना झाल्याने घरात सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी आलेल्या दोघा जणांवर चोरीचा संशय घेतला गेला होता. परंतू कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या तपासात सात महिन्यांनी का होईना या गुन्हयाची उकल झाली असून घरकाम करणा-या महिलेच्या नव-यानेच या दागिन्यांची चोरी केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून 4 लाख 80 हजाराचे 11 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (वय 36) असे अटक आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून समांतर तपास सुरू होता. त्यांच्याकडून संशयितांसह रंगकाम आणि घरकाम करणा-यांसह अनेकांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान संशयावरून घरकाम करणा-या महिलेसह तीचा नवरा हितेश याचीही चौकशी केली गेली होती. दरम्यान त्याने दिलेला जबाब आणि त्याच्या मोबाईल ट्रेसींग आणि कॉलच्या मिळालेल्या माहीतीत पोलिसांना विसंगती आढळुन आली. त्यामुळे त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली गेली. तपासाअंती त्याच्यावरील संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गोगरी यांच्या घरातील 11 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. हितेशने संबंधित दागिने काही जणांना विकले होते परंतू पोलिसांना चोरलेले 4 लाख 80 हजाराचे सर्व दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. वरीष्ठ पोलिस निरिक्षक मनोहर पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक भुषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, सचिन साळवी, अनुप कामत, महेश साबळे, पोलिस शिपाई गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी, महिला पोलिस हवालदार ज्योत्स्ना कुंभारे आदिंच्या पथकाने ही कामगिरी केली.
...त्यामुळे चोरी करण्याची वेळ आलीआपण मुंबईत एका ठिकाणी काम करत होतो परंतू कोरोनामुळे नोकरी गेली. नोकरी गेल्यावर हाताला मिळेल ती कामे करायचो परंतू तुटपुंज्या मिळणा-या कमाईपुढे उदरनिर्वाह चालविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे चोरी करण्याची वेळ आल्याची माहीती हितेशने चौकशीत दिल्याची माहीती या गुन्हयाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर यांनी दिली.