प्रमाणिकपणामुळे रेल्वेमध्ये दागिन्यांची हरवलेली पर्स मिळाली परत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 10:48 PM2019-06-19T22:48:42+5:302019-06-19T22:50:36+5:30
लक्ष्मी रघुनाथ साळुंखे यांना सदर पर्स सोन्याच्या दागिन्यासह मिळून आली व त्यांनी ती प्रामाणिकपणे दादर रेल्वे पोलीस ठाणेत परत केली.
मुंबई - रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडीत विसरलेली पर्स आणि 3 लाख 37 हजार 900 रुपयांचे 11तोळ्याचे सोन्याचे दागिने दादर रेल्वे पोलीसंकडून परत करण्यात आले आहेत. त्यामुळे दादर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तक्रारदार हमीद रज्जाकशा फकीर (५९) राहणार लक्ष्मीबाग,घाटकोपर पुर्व हे आणि त्यांची पत्नी नामे रसिदा हमीद फकीर असे दिनांक १७/०६/२०१९ रोजी मसुर रेल्वे स्टेशन ते ठाणे रेल्वे स्टेशन असा अप कोयना एक्सप्रेस गाडीचे जनरल डब्यातून प्रवास करत होते. सदर गाडी सुमारे २०.१५ वाजता ठाणे रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर ते त्यांच्या जवळील पर्स आतमध्ये ११ तोळे सोन्याच्या दागिने असलेली एकूण किंमत रक्कम रु.३,३७,९00 /- अशी गाडीतच विसरून ते तसेच ठाणे रेल्वे स्टेशनवर उतरले. सदरची गाडी गेल्यानंतर त्यांची पर्स गाडीत विसरून राहिली असलेबाबत त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या पर्सचा सी.एस.एम.टी.रेल्वे स्टेशन व दादर रेल्वे स्टेशन येथे शोध घेतला.परंतु पर्स मिळुन न आल्याने त्यांनी दादर रेल्वे पोलीस ठाणेत तक्रार नोंद केली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दादर रेल्वे पोलीस ठाणेतील पोलीस सदर पर्सचा शोध घेत होते.पर्सचा शोध चालू असताना इसम नामे संतोष रघुनाथ साळुंखे व्यवसाय नोकरी राहणार-माहीम मुंबई यांनी दादर रेल्वे पोलीस ठाणेत फोनद्वारे कळविले की, त्यांची आई नामे लक्ष्मी रघुनाथ साळुंखे ह्या दिनांक १७/०६/२०१९ रोजी कोयना एक्सप्रेस गाडीने प्रवास करत असताना त्यांना एक पर्स मिळुन आलेली आहे. सदर पर्स कोणाची आहे याबाबत माहिती नसून त्याबाबत काही तक्रार पोलीस ठाणेत दाखल आहे का? असे काळविताच त्यांना पर्सबाबत तक्रार दाखल असून पर्ससह तात्काळ दादर रेल्वे पोलीस ठाणेत हजर राहणेबाबत कळविले, तसेच तक्रारदार यांना ही पोलीस ठाणेत बोलावून घेण्यात आले व मिळून आलेली पर्स आतील सोन्याचे दागिने याबाबत खात्री केली असता ती तक्रारदार यांची असल्याची खात्री झाल्याने सदरची पर्स व सोन्याचे दागिने तक्रारदार यांना खात्री करुन परत करण्यात आले.
तसेच लक्ष्मी रघुनाथ साळुंखे यांना सदर पर्स सोन्याच्या दागिन्यासह मिळून आली व त्यांनी ती प्रामाणिकपणे दादर रेल्वे पोलीस ठाणेत परत केली. दादर रेल्वे पोलीस ठाणेतील पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तक्रारदार यांची पर्स आतील सोन्याचे दागिने असलेली रक्कम रु.३,३७,९००/- ची तक्रारदार यांना परत मिळाली त्याबद्दल त्यांनी दादर रेल्वे पोलीसांचे खुप आभार तक्रारदार यांनी मानले.