धुळे : जागा नावावर करुन घेण्याच्या वादावरून व्यापाऱ्याशी वाद घालण्यात आला. शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ऐवज ही लुटून घेण्यात आला. ही घटना धुळ्यातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. आझादनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजत तिघांवर गुन्हा दाखल झाला.
व्यापारी योगेश सुरेश चौधरी (वय ४५, रा. रामचंद्रनगर, पारोळा रोड, धुळे) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, धुळे तालुक्यातील पिंपरी शिवारात गट नंबर ९० हा नावे करुन घेण्याकरिता गेल्या काही दिवसांपासून दमदाटी आणि शिवीगाळ केली जात होती. अशातच चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल जवळून योगेश चौधरी जात असताना त्यांना अडविण्यात आले. त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्या गळ्यातील ११ तोळे वजनाची सोन्याची चैन, ३ हजार ८०० रुपये किमतीची रोख रक्कम खिशातून बळजबरीने एकाने काढून घेतली.
एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तो वार चुकविल्याने सुदैवाने ते वाचले. इतरांनी हाताबुक्क्यांनी हल्ला चढविला. यात त्यांना हाता-पायासह चेहऱ्यावर आणि मानेला दुखापत झाली. या घटनेनंतर तिघांनी पळ काढला. जखमी अवस्थेत योगेश चौधरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर व्यापारी चौधरी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३२४, ३२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बी. डी. कोकणी करीत आहेत.