सेल्फीच्या नादात बसला ओव्हरहेड वायरचा धक्का; तरुण ८० टक्के भाजला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 08:53 AM2022-09-14T08:53:41+5:302022-09-14T08:53:54+5:30
प्रकृती चिंताजनक, शेख जोगेश्वरी स्टेशनच्या बाहेरील एरिया शॉपमध्ये लोडिंग-अनलोडिंग एजंट म्हणून काम करतो
मुंबई : जोगेश्वरी रेल्वे यार्ड येथे सोमवारी सकाळी अमन शेख (२०) नामक तरुण हा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने ८० टक्के भाजला. तो सेल्फी काढण्यासाठी टपावर चढला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार बोरिवली रेल्वे पोलीस अधिक तपास करत असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जोगेश्वरी स्टेशनच्या बाहेरील एरिया शॉपमध्ये लोडिंग-अनलोडिंग एजंट म्हणून काम करतो. जिथून फ्लिपकार्टवर पार्सल ऑर्डर वितरित केल्या जातात. शेख सोमवारी पहाटे साडेपाच वाजता तो ड्यूटीवर हजर झाला. मात्र, कोणतेही काम नसल्याने तो सकाळी साडेनऊ वाजता दुकानातून बाहेर पडला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी जोगेश्वरी आवारात पॉइंट मॅनला मोठा आवाज आला. तेव्हा राममंदिर ते जोगेश्वरी स्थानकादरम्यानच्या रुळांच्या पूर्वेकडे त्यांनी धाव घेतली. तेव्हा शेख त्यांना जमिनीवर पडलेला दिसला.
सीसीटीव्ही नसल्याने तपास अवघड
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम म्हणाले, ‘शेख सेल्फी घेण्यासाठी वर चढला होता, हे सांगणारे कोणीही प्रत्यक्षदर्शी आम्हाला अद्याप सापडला नाही, याठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने नेमके काय घडले, त्याचा तपास आम्ही करत आहोत.’