राज्यभरातील एटीएम केंद्रातून लाखोंची लूट करणारी दुक्कल गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:36 AM2020-01-15T04:36:37+5:302020-01-15T06:39:52+5:30
ठाणे गुन्हे शाखेची कारवाई : महाराष्ट्रसह आंध्र प्रदेशातील ५० हून गुन्हे उघड होण्याची शक्यता
ठाणे : मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह राज्यभरातील इतर एटीएम केंद्रातून वयोवृद्धांच्या बँक खातेदारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे.
श्रीकांत गोडबोले (२५, रा. मलंग रोड, कल्याण, ठाणे) आणि प्रवीण साबळे (२२, रा. मालेगाव एमआयडीसी, राजवाडा, सिन्नर, जिल्हा नाशिक) अशी त्यांची नावे आहेत. गेल्या वर्षभरामध्ये श्रीकांत आणि ्प्रवीण यांनी अशा प्रकारे अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची बाब चौकशीत उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे येथील डायघर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दहिसर-मोरी येथील विजया बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये १७ आॅक्टोबर, २०१८ रोजी गोरखनाथ योगी (६२) हे पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढून देण्याच्या बहाण्याने या दोघांनी त्यांचे एटीएम कार्ड काढून घेतले होते. त्यांना बनावट कार्ड देऊन त्यांच्या बँक खात्यातून त्यांनी ३० हजारांची रोकड काढली होती. पुढे त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नाशिकसह राज्यभरातील अनेक एटीएम केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांना गाठून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लुबाडली. हे वाढते प्रकार लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सुरू केला होता.
डायघर येथील घटनेमध्ये सीसीटीव्हीमध्ये मिळालेले फूटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, पोलीस हवालदार संजय बाबर, शिवाजी गायकवाड, पोलीस नाईक अमोल देसाई आणि पोलीस कॉन्स्टेबल नीलम पाचपुते आदींच्या पथकाने उल्हासनगर येथून ११ जानेवारी २०२० रोजी यातील संशयित श्रीकांत गोडबोले आणि प्रवीण साबळे या दोघांना अटक केली.
सखोल चौकशीमध्ये त्यांनी अशाच प्रकारे ८ डिसेंबर, २०१८ ते २० डिसेंबर, २०१९ या वर्षभराच्या कालावधीमध्ये राज्यभरातील ५० पेक्षा अधिक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार उघड झाले आहे. या काळात त्यांनी १० ते १२ लाखांची फसवणूक केल्याची बाब प्राथमिक तपासामध्ये समोर आली आहे. त्यांच्याकडून २० हजारांची रोकड जप्त केली आहे. त्यांना १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती रुपयांची फसवणूक केली, याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशी होती गुन्हे करण्याची पद्धत
श्रीकांत आणि प्रवीण यांनी प्लास्टीकचे एटीएम कार्ड बनवून घेतले होते. एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाºया वयोवृद्धांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमचे पासवर्ड लक्षात ठेवत असत. पैसे काढल्यानंतर त्यांना त्यांचे एटीएम कार्ड न देता स्वत:जवळील दुसरे प्लास्टीकचे एटीएम कार्ड ते देत असत. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डवरून पैसे काढून घेणे किंवा एटीएम कार्डद्वारे खरेदी केली जात असे. दुसºया प्रकारामध्ये बँकेमध्ये पैसे भरण्यास उभ्या असलेल्या लोकांजवळ त्यांच्याकडील रु मालामध्ये पैशाची गड्डी असल्याचे भासवित असत. ते पैसे त्यांना अकाउंटद्वारे गावी पाठवायचे असल्याची बतावणी करीत. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडील रोकड घेऊन या भामट्यांकडे असलेल्या कागदाच्या गड्डी संबंधित व्यक्तीला देऊन खातेदाराची फसवणूक करीत असल्याचे समोर आहे.
या जिल्ह्यांमध्ये फसवणूक
या भामट्यांनी महाराष्ट्रातील ठाणे, अहमदनगर, नाशिक, पुणे, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धुळे, जळगाव, सोलापूर, यवतमाळ, उस्मानाबाद, सांगली, सातारा, पालघर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये, तसेच आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथेही फसवणूक केल्याचे त्यांच्या मोबाइलद्वारे केलेल्या विश्लेषणातून समोर आले आहे.
फसवणूक झालेल्यांनी, तसेच संबंधित पोलिसांनी संपर्क साधावा
अशा दोन प्रकारे फसवणूक झालेल्या बँक खातेदार, तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे ९८६७८५२७७७ तसेच सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे ९८२३१४४७८४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केले आहे.