मुंबई - गेल्या गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास विक्रोळी येथील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव हे नियमितपणे देवदर्शनासाठी साईबाबा मंदिर,टागोरनगर, विक्रोळी येथे गेले होते. देवदर्शन आटोपून ते मंदीरातील कार्यालयात बसले असताना अचानकपणे एका अनोळखी इसमाने आत येऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला दुखापत झाली. हल्लेखोर पळून जात असताना जखमी जाधव व मंदिरातील इतर लोकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने आणखी गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी जमलेल्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून त्यास जागीच पकडले. पोलिसांनी अटक केलेल्या या शूटरचे नाव सागर मिश्रा असं आहे. सागर मिश्राच्या अधिक चौकशीनंतर मध्यप्रदेश येथे गेलेल्या पथकाने कृष्णधर सिंग यास ताब्यात घेतले. ठाणे येथे गेलेल्या पथकाने आनंद फडतरेला ताब्यात घेतले. या दोघांना कोर्टात हजर केले असता १ जानेवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गोळीबार करणाऱ्या सागर मिश्राला पकडताना झालेल्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यास गोळीबार करण्याचे कारण विचारले असता, 'प्रसाद पुजारी नेमारने के लिए भेजा है।' असे त्याने चंद्रशेखर जाधव यांना सांगितले. त्यानंतर जखमी जाधव व गोळीबार करणाऱ्या इसमास उपचारासाठी रूगणालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विक्रोळी पोलीस ठाण्यातून हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाने सुरु केला. या प्रकरणातील गोळीबार करणारा जखमी इसम हा गंभीर जखमी असल्याने सुरुवातीस बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता. नंतर तो स्वत:च्या नावासह सर्व माहिती खोटी सांगत असल्याने तपासकामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आरोपीने ज्या रिव्हॉल्वरमधून जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. ते रिव्हॉल्वर हे कानपुर आईनन्स फॅक्टरी येथील बनावटीचे असल्याने त्यांचेकडून लायसन्स धारकाची माहिती प्राप्त करण्यात आली.
पुढील तपासकामासाठी खंडणीविरोधी पथकाची आणखी तीन पथके ठाणे, मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथे रवाना झाली. त्यानंतर मध्यप्रदेश येथे गेलेल्या पथकाने कृष्णधर सिंग यास ताब्यात घेतले तर ठाणे येथे गेलेल्या पथकाने आनंद फडतरे यास ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या चौकशीत असे निदर्शनास आले की, परदेशास्थित गँगस्टर प्रसाद पुजारी याने सुरूवातीस मध्यप्रदेश येथील त्याचे साथीदार कृष्णधर सिंग व सागर मिश्रा (गोळीबार करणारा जखमी इसम) यांना जाधव यांच्यावर गोळीबार करण्याच्या उद्देशाने मुंबईत पाठविले होते. मुंबईत पोहचल्यानंतर प्रसाद पुजारी याच्या सांगण्यावरून त्याच्या मुंबईतील एका साथीदारांनी त्यांची राहण्याची सोय केली. त्यानंतर सदर साथीदाराला आरोपी आनंद फडतरे, राहणार - ठाणे याने विनानंबर प्लेटची मोटरसायकल पुरविली. ती मोटार सायकल घेऊन सिंग हा साथीदार गोळीबार करण्यासाठी सागर मिश्रा याच्यासह टागोरनगर येथे आला. चंद्रशेखर जाधव हे सदर ठिकाणी आल्याची खात्री करून सागर मिश्रा याने त्यांच्यावर गोळीबार केला.