गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला गंडा, शस्त्र परवान्यासाठी साडेनऊ लाखाला लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:00 PM2019-03-13T14:00:56+5:302019-03-13T14:03:10+5:30
पेठेवर आठ वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई - शस्त्र परवाना काढण्यासाठी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला साडेनऊ लाखांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चुना लावणाऱ्या इसमास अटक केली आहे. अतुल पेठे असं या भामट्याचे नाव असून तो ठाण्यात राहतो. यापूर्वीही पेठेवर आठ वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंबरनाथमध्ये राहणार व्यावसायिक उमेश पवार यांनी शस्त्र परवाना काढण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी तुमचे काम गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याद्वारे करून देतो अशी बतावणी करून अतुल पेठे या भामट्याने पवार यांच्याकडून तब्बल साडेनऊ लाख रुपये उकळले आहेत.मात्र, १ वर्ष उलटून गेले तरी परवाना न मिळाल्याने पवार यांनी चौकशी केली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे त्यांना समजले.
अर्ज फेटाळल्याची माहिती मिळताच पवार यांनी भामट्या पेठेकडे त्याबाबत चौकशी केली. त्यावर पवार यांना पेठेने अरेरावीची उत्तरे दिली. त्यामुळे पवार यांनी पोलिसांत धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी चौकशी करून पेठे याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी पेठे याच्याकडे अधिक चौकशी केली. तसेच याबाबत तपास केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पेठे हा काही वर्षांपूर्वी एयर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होता. गृहराज्यमंत्री रणजित पाटील किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांशी पेठे याचा संबंध नसल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.