नागपूर - माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेद्वारे संचालित नागपूर तालुक्यातील माऊरझरी येथील NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर शुक्रवारी 12.15 वाजताच्या सुमारास ईडीने धाड टाकली. तब्बल तीन तास एडीचीही छापेमारी चालली. देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी साई शिक्षण संस्थेच्या वापर केला असा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने डोनेशन म्हणून या शिक्षण संस्थेत पैसे टाकले होते. त्यासाठी बोगस शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. त्याचाच तपास करण्यासाठी ईडीचे एक पथक शुक्रवारी माऊरझरी येथील NIT कॉलेज मध्ये पोहचले. या पथकात तीन अधिकाऱ्याचा समावेश होता. ईडीने आपल्या सोबत सीआरपीएफचे पथक सोबत आणले होते.
साई शिक्षण संस्थेचे हे कॉलेज आहे. इथं काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या संस्थेत अनिल देशमुख संचालक आहेत. त्यांचे पुत्र आणि परिवारातील इतर सदस्य पदाधिकारी या संस्थेत एक्झिक्यूटिव्ह कमिटी सदस्य आहेत.
ईडीने यापूर्वी अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर आणि काटोल इथल्या निवासस्थानी आणि संस्थांवर छापे टाकले होते. त्यावेळी साई शिक्षण संस्थेसोबत काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे धागेदोरे त्यांना मिळाले होते. त्यापार्श्वभूमीवर आज ईडीने अनिल देशमुख यांच्या NIT कॅम्पस कॉलेज परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं. या सर्च ऑपेरेशनमध्ये काही महत्त्वाची कागदपत्र ईडीची टीम घेऊन गेली. अनिल देशमुख यांना ईडीनं आत्तापर्यंत चार वेळा समन्स बजावून देखील ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत.