स्कायवॉकवर शिक्षिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:55 AM2018-07-30T00:55:39+5:302018-07-30T00:56:36+5:30
शाळेतून घरी जाण्यासाठी स्कायवॉकवरून निघालेल्या ५८ वर्षीय शिक्षिकेला एका विकृताने धक्का देत खाली पाडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करत, जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली.
मुंबई : शाळेतून घरी जाण्यासाठी स्कायवॉकवरून निघालेल्या ५८ वर्षीय शिक्षिकेला एका विकृताने धक्का देत खाली पाडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करत, जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली. घाबरलेल्या शिक्षिकेने कसेबसे त्याच्या तावडीतून सुटका करत पळ काढला. तो विकृतही त्यांच्यामागे धावू लागला. अखेर पायऱ्यांखाली असलेल्या गर्दीकडे त्यांनी मदत मागितली. जमावाने पळण्याच्या तयारीत असलेल्या वाजीद नागोरी (३७) या विकृताला ताब्यात घेत चोप दिला. वांद्रे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरवणीवर आला आहे.
वसईच्या रहिवासी असलेल्या या शिक्षिका वांद्रे येथील एका नामांकित शाळेत शिकवतात. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास त्या शाळेतून घरी जाण्यासाठी स्कायवॉकवरून निघाल्या. एकट्या असलेल्या शिक्षिकेवर वाजीदची नजर पडली. आजूबाजूला कोणी नाही, याची संधी साधून वाजीदने हाताने त्यांच्या छातीवर धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन त्या खाली कोसळल्या. त्या उठण्याचा प्रयत्न करणार, तोच वाजीदने त्यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
वाजीदला प्रतिकार करत, शिक्षिकेने त्याच्या तावडीतून सुटका करत ‘बचाव बचाव’ म्हणत त्यांनी पळ काढला. वाजीदही त्यांच्यामागे पळत होता. अखेर पाय-यांखाली उभ्या असलेल्या पादचारी आणि वाहनचालकांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. गर्दी जमत असल्याचे पाहून वाजीद मागे फिरला. जमावाने पाठलाग करत त्याला चोप देत वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले.
शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे गिरीश अवणकर यांनी दिली. प्राथमिक तपासात तो अभिलेखावरील आरोपी नसल्याचेही अनवकर यांनी सांगितले. वाजीद हा बेरोजगार असून, वांद्रे (प) शास्त्रीनगर परिसरात राहतो. या घटनेमुळे तक्रारदार शिक्षिका या मानसिक तणावाखाली आहेत.