पुणे : ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करुन त्यांना पेटीएमचे केवायसीची सस्पेंड झाल्याचे सांगून ते अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचे गुन्हे दररोज समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी येथील ५५ वर्षांच्या गृहस्थाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हे गृहस्थ १८ फेबुवारी रोजी घरात असताना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तुमची पेटीएमची केवायसी सस्पेंड झाली असून मोबाईलवर संपर्क साधा, असे मेसेजमध्ये म्हटले होते. त्यानुसार त्यांनी संबंधित मोबाईलवर फोन केला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांच्या विश्वास संपादन करुन त्यांना क्विक सपोर्ट अॅप डाऊन लोड करायला सांगितले. त्यानुसार फिर्यादीने डाऊन लोड केल्यानंतर पेटीएमची लिंक असलेल्या फिर्यादीच्या बँक खात्यावरुन २५ हजार, ९ हजार ९९९ रुपये व ८ हजार ९९९ रुपये असे एकूण ४३ हजार ९९८ रुपये ऑनलाईन ट्रान्झेक्शन करुन फसवणुक करण्यात आली. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता़. त्यावरुन तपास केल्यानंतर आता बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गेल्या तीन दिवसात किमान ३ तक्रारी शहरातील पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
दररोज एका नागरिकांची होतेय पेटीएम अपडेटच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 8:49 PM