कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बॉलीवूडमधील एका लेखकाने आपल्या गर्लफ्रेंडला खूश ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. या प्रियकराने अनेकांना लाखो रुपयांचा चूना देखील लावला आहे. हा आरोपी बॉलिवूडमधील पटकथा लेखक आहे. शुभम पीतांबर साहू असं या २८ वर्षीय लेखकाचं नाव आहे.आपल्या युट्युबर प्रेयसीला आर्थिक छानछान भासू न देता खूश ठेवण्याच्या नादात लेखक प्रियकराला आता सायबर फ्रॉड केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शुभम शाहू हा बॉलीवूडमधील छोटा-मोठा स्टोरी रायटर आहे. सध्या तो ओशिवारा पोलिसांच्या ताब्यात आहे. स्टोरी रायटींगमधून त्याची चांगली कमाई होत होती. परंतु कोरोनामुळे अचानक मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि शुभम आर्थिक पेचात सापडला.
ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहू हा एका मुलीच्या प्रेमात होता. ही मुलगी एक युट्य़ूबर आहे. आपण सामोरं जात असणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत प्रेयसीला माहिती मिळू नये यासाठीच त्यानं लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. याच फसवणुकीतून आलेल्या पैशांतून त्यानं प्रेयसीला सोन्याची बांगडी भेट दिली. इतक्यावरच न थांबता त्याने प्रेयसीला जयपूरला सहलीसाठी नेण्याचीही व्यवस्था केली.
लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याने एक नवा मार्ग अवलंबत मुंबईतील लोखंडवाला भागातील एका टूर्स एँड ट्रॅव्हल कंपनीशी संपर्क करुन त्य़ानं ऑनलाईन फ्लाईट आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये रुम बुक केला. या साऱ्याचं बिल 32 हजार रुपये इतकं झालं. अनलॉकनंतर सगळे व्यवहार खुले झाल्याने शुभमनं आपल्या प्रेयसीला बाहेर फिरायला घेवून जाण्यासाठी मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत विमानाची तिकिट त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये बुकिंग केलं. प्रेयसीला महागडे गिफ्ट देण्याकरता पैसे मिळवण्यासाठी शुभनने बल्क मॅसेजचा वापर केला. यासाठी त्याने इंटरनेटवर त्या ट्रॅव्हल कंपनीमधून या आधी बुकिंग केलं आणि त्याचे पैसे ॲानलाईन ट्रान्सफर केल्यानंतर येणाऱ्या मॅसेजचा फोटो काढून इंटरनेटवर अपलोड केला होता. तोच मॅसेज पाहून तसाच मॅसेज बनवून त्याने ट्रॅव्हल कंपनीला पैसे पाठवल्याचे भासवले.