राज ठाकरेंच्या नावे खंडणीची मागणी; चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:14 AM2021-10-18T10:14:27+5:302021-10-18T10:15:49+5:30
मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मढ परिसरातील एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली तसेच सुरक्षा रक्षकाकडे पैशांचीही मागणी केली होती.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि त्यांच्या चालकाला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. तर एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस पाठवली आहे.
मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मढ परिसरातील एका बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली तसेच सुरक्षा रक्षकाकडे पैशांचीही मागणी केली होती. पुढे आरोपींनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्यानंतर संबंधित घटनेचा व्हिडिओही व्हायरल केला होता. १५ तारखेला सुरक्षा रक्षकाने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार,पोलिसांनी मारहाण, खंडणी प्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. तपास सुरू करत दिग्दर्शक मीलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलंकर यांना अटक केली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला नोटीस बजावली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ती असल्याचीही माहिती समोर आली आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करताना ती त्याला राजसाहेबांना ओळखत नाहीस का? तू मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही? काम कोणासाठी करतोस? असे अनेक प्रश्नही विचारताना दिसत आहे.
महिलेला नोटीस पण... गैरहजर
याप्रकरणातील महिलेला चौकशीसठी नोटीस पाठवून हजर राहण्यास सांगण्यात आले होते; मात्र ती हजर राहिली नाही. याप्रकरणी महिलेला पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.