इंदुर – अंडरकवर पोलीस अधिकारी बनून मुलीशी साखरपुडा केला. त्यानंतर हुंडा म्हणून ८ लाख रुपये आणि एक स्कुटी घेतली. मुलीसमोर स्वत:ला पोलीस उपनिरीक्षक असल्याचं भासवत होता. यावेळी युवतीला युवकाच्या हालचालीवर संशय आला. त्यानंतर युवकाची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी युवकाबद्दल तिच्या हाती जे पुरावे लागले त्याने मुलीला धक्काच बसला. सत्य समजल्यानंतर युवतीनं कॉलरनं पकडून मारत पोलीस स्टेशनला आणलं.
पीडित युवतीने विजय नगर पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. हा युवक बनावट पोलीस अधिकारी असल्याचं सांगत युवतीशी लग्न करणार होता. पोलिसांनी आरोपीकडून बनावट ओळखपत्रं जप्त केले. आरोपी राजवीर सोलंकीवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवतीला राजवीरने अंडरकव्हर पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं होते. दोघांची मैत्री झाली त्यानंतर प्रेमात रुपांतर होऊन लग्नापर्यंत गोष्ट पोहचली. काही काळात युवकाने युवतीच्या घरच्यांकडून लाखो रुपये आणि एक्टिव्हा गाडी घेतली होती. २०१९ मध्ये दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर पुढील वर्षी ९ मे २०२२ रोजी लग्न होणार होतं. परंतु राजवीरच्या वागण्यात बदल झाल्याने युवतीला संशय आला. अवघ्या ४ महिन्यातच शिपाईपासून एएसआयपदावर बढती झाल्याचं राजवीरनं युवतीला सांगितले. त्यानंतर युवतीला संशय आल्यानंतर तिने तिच्या इजिनिअर भावासोबत मिळून राजवीरची पोलखोल केली.
युवक पोलीस अधिकारी नसल्याचा आला संशय
युवक पोलीस अधिकारी नसल्याचा युवतीला काही गोष्टींवर संशय आला. त्यानंतर तिला काही पुरावे मिळाले. पोलीस तपासात कळाले की, हा युवक पोलीस अधिकारी नसून सिमरोल येथील रहिवासी आहे. शिपाई ते उपनिरीक्षक असा बनावट प्रवास त्याने काही महिन्यात निश्चित केला. ज्यामुळे युवतीला शंका आली. इतकचं नाही तर आरोपीने आणखी एका युवतीची ४० लाखांची फसवणूक केल्याचं समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणात अनेक गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे. युवकाची चौकशी सुरू आहे. अनेक महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात. आरोपी राजवीरनं याआधीही अनेक मुलींना फसवल्याचं समोर येत आहे असं पोलीस अधिक्षक आशुतोष बागरी यांनी सांगितले.