"शेतकऱ्यांच्या दबावामुळे सांगितली खोटी कहाणी," सिंघू बॉर्डरवर पकडलेल्या संशयिताची धक्कादायक कबुली
By बाळकृष्ण परब | Published: January 23, 2021 03:46 PM2021-01-23T15:46:43+5:302021-01-23T15:50:27+5:30
Farmer Protest : आज शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा करत एका संशयित व्यक्तीला आंदोलकांनी पकडून माध्यमांसमोर आणले होते.
नवी दिल्ली - कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू केलेले आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. त्यातच शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात होत असलेल्या चर्चांमधून तोडगा निघत नसल्याने तिढा कायम आहे. त्यातच आज शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा करत एका संशयित व्यक्तीला आंदोलकांनी पकडून माध्यमांसमोर आणले होते. मात्र आता या संशयित व्यक्तीने पुन्हा एकदा आपला जबाब बदलला असून, आंदोलक शेतकऱ्यांच्या दबावामुळे आपण शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे विधान केले होते, अशी कबुली दिली आहे.
आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांच्या हत्या करण्याचे कारस्थान रचल्याची कबुली योगेश नामक तरुणाने दिली होती. दरम्यान, आता आपला जबाब बदलताना योगेशने सांगितले की, काही लोकांनी मला पकडून कॅम्पमध्ये नेले. तिथे मारहाण केली. मला मारल्यानंतर खाऊपिऊ घातले. दारू पाजली. त्यानंतर त्यांनी माझा व्हिडीओ बनवला. माझ्यासोबत अजून चार जणांना पकडण्यात आले होते. यामधील एकाचे नाव सागर होते. इतरांची नावं मला माहिती नाही.
योगेशने पुढे दावा केला की, त्या लोकांनी मला घाबरवले. आम्ही सागरला ठार केले आहे, असे सांगितले. आता तुला सुटायचे असेल तर आता आम्ही सांगू ते तुला प्रसारमाध्यमांसमोर सांगावे लागेल. तिथे एक खोटी कहाणी रचण्यात आली. ती मी प्रसारमाध्यमांसमोर सांगितली. त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी हे सारे सांगितले. त्यानंतर मी पोलिसांसमोर गेल्यावर खरी परिस्थिती सांगितली.
योगेश म्हणाला की, मी हरियाणामधील सोनीपत येथील रहिवासी आहे. योगेशने सांगितले की, १० तरुण अजून दिल्लीत येतील. एक तरुण सध्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. दरम्यान, आज सकाळी योगेशने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते की, शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे आदेश त्याला सोनिपतमधील राई पोलीस ठाण्याचे एसएचओ प्रदीप यांनी दिले होते. मात्र अधिक तपास केला असता राई पोलीस ठाण्यात प्रदीप नावाचा कुणी अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, २६ जानेवारी रोजी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने आपण आलो होते, असे योगेश यांनी सांगितले.