लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पिस्तुलचा धाक दाखवून पानटपरीचालकाला १० हजाराची खंडणी मागणाऱ्या गुंडावर सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देवेंद्र शिर्के (वय ४५) असे आरोपीचे नाव असून तो सक्करदऱ्यातील सुर्वे ले-आऊटमध्ये राहतो.
मंगेश दिगांबर काकडे (वय ३४, रा. राजे रघुजीनगर, छोटा ताजबाग) यांचे ताजबाग चाैकात महेश पान पॅलेस आहे. २५ डिसेंबरच्या दुपारी मंगेश आणि त्याचा आतेभाऊ विक्की कांबळे पान टपरीवर असताना आरोपी शिर्के तेथे आला. त्याने कंबरेत खोचलेले पिस्तुल दाखवून अश्लील शिवीगाळ करीत काकडेला १०हजाराची खंडणी मागितली. येथे पानठेला चालवायचा असेल तर खंडणी द्यावी लागेल,अन्यथा जिवे मारेन, अशीही धमकी त्याने दिली. मंगेश काकडेने दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.