मुंबई - मरिन लाईन्स येथील एका बड्या हॉस्पिटलमधील ४० वर्षीय डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कुणाल पुखराज हिंगर या कथीत व्यापार्याला बुधवारी अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अंधेरी कोर्टाने येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले.
पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार विलेपार्लेत राहणार्या कुणालची आई तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ साली दक्षिण मुंबईतील मारिन लाईन्स येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होती. त्यावेळी कुणालने सहानुभूती मिळवून पीडित डॉक्टरचा मोबाईल क्रमांक मिळविला होता. नंतर त्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून डॉक्टर महिलेशी संपर्क साधून तिच्याशी मैत्री केली. सप्टेंबर २०१५ रोजी कुणालने अंधेरी येथे राहणार्या बहिणीच्या घरी तिला जेवणासाठी बोलाविले होते. जेवणानंतर त्याचे आई-वडील नातेवाईकांकडे निघून गेले. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी बळजबरीने लैंगिक शिक्षण केले. दरम्यान, तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवू लागला. तसेच या वर्षात कुणालने डॉक्टरकडून १४ लाख ७५ हजार रुपये उकळले.
पैसे मिळाल्यानंतर कुणालने लग्न करण्यास नकार दिला. कुणालकडून होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने आझाद मैदान पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा तपास अंधेरी पोलिसांकडे वर्ग केला होता. या गुन्ह्याचा तपास हाती येताच त्याला बुधवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्याची जबानी नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुणालविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२० आणि ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.