लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : आटपाडी आणि मासाळवाडी येथे खासदार संजयकाका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटात मंगळवारी जोरदार मारामारी झाली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची वाहने फोडण्यात आली. या प्रकरणी पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि मुंबईतील आयकर विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह १२ जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार संजयकाका पाटील या दोघांच्याही समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शांताबाई मारुती मासाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मासाळवाडी येथे सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गणेश भुते यांच्यासह पाचजण मंदिरात चप्पल घालून आले. त्यांना चप्पल घालून येऊ नका, असे म्हटल्यावर त्यांच्याशी वादावादी झाली. मंगळवारी दुपारी संबंधित जमावाने येऊन दोन मोटारी फोडल्या. शांताबाई मासाळ, प्रदीप दगडू पुकळे यांना मारहाण करून जखमी केले. शांताबाई यांचे साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र तोडले. मोटारीवर दगडफेक करून त्यातील ८२ हजारांची रक्कम चोरून नेली. दरम्यान, विष्णू लक्ष्मण अर्जुन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खासदार समर्थकांनी त्यांची मोटार फोडली. खिशातील ५० हजारांची रक्कम हिसकावून घेतली. गळ्यातील सोन्याची साखळीही नेली. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सायंकाळपर्यंत कुणालाही अटक केलेली नव्हती.
टोकाचा संघर्षसंजयकाका पाटील आणि गोपीचंद पडळकर या भाजपच्याच खासदार-आमदार गटांतील संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होऊ लागला आहे. मंगळवारी दोन्ही गटांचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोर जमले. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांना पांगविण्यास पोलिसांना कसरत करावी लागली. पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे परिस्थिती हाताळण्यासाठी रात्री उशिरापर्यंत आटपाडी पोलीस ठाण्यात बसून होते.