ठाणे : भिवंडी तालुक्यातील घोटगाव, गोठणपाडा गावच्या प्रीती भावर (२८) या महिलेचा अत्याचार करून अमानुषपणे खून करणा-या रमेश लाडक्या भावर (५०) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. त्याला ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश भिवंडी न्यायालयाने दिले आहेत.वालीव येथून कामावरून परतणाºया प्रीती या विवाहितेला रस्त्यात अडवून नंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अत्याचारानंतर निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व पातळ्यांवर तपास यंत्रणा सक्रिय केली होती. तिच्या खुन्यांना तत्काळ अटकेच्या मागणीसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी २० सप्टेंबर २०१९ रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची भेट घेऊन यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम लोंढे, गणपत सुळे, उमेश ठाकरे, पोलीस नाईक हणमंत गायकर, अमोल कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी राय आदींच्या पथकाने १ आॅक्टोबर रोजी रमेशला ताब्यात घेतले. तिचे त्याच्याशी सासºयाचे नाते आहे. तरीही, त्याची तिच्यावर अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. १५ सप्टेंबर रोजीही तो गोठगाव भागातील जंगलातच घुटमळत होता, अशी माहिती या पथकाला मिळाल्यानंतर त्याची त्या दिवशीची संपूर्ण दिनचर्या पोलिसांनी पडताळली. त्याने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी आपल्या ‘खास’ शैलीत त्याला बोलते केले. त्यानंतर, आपल्याकडून ही आगळीक झाल्याची त्याने कबुली दिली.काय घडला होता प्रकार : वालीव येथे कामाला जाणारी प्रीती ही विवाहिता १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरी पायी जात होती. त्यावेळी गोठगाव परिसरात रमेशने तिला गाठून तिला जंगलात नेऊन तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. तिने विरोध केल्याने तसेच आपले बिंग फुटू नये म्हणून त्याने तिचे डोके दगडावर आपटले. यात ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्याच साडीने तिला गळफास देऊन तिची हत्या केल्याची त्याने कबुली पोलिसांना दिली. पती आणि पाच वर्षांची मुलगी तिच्यामागे असून सामान्य घरातील या महिलेचा अत्याचारानंतर निर्घृण खून झाल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संताप व्यक्त होत होता.गणेशपुरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश सागडे यांचे पथकही या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते. पोलिसांनी सखोल तपास करीत आरोपीला अटक केल्याने प्रीतीच्या मारेकºयांच्या अटकेसाठी पाठपुरावा करणाºया जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या कारवाईने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे झडपोली येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सदस्या भावना घाटाल यांनी म्हटले आहे.
अखेर प्रीती भावरच्या मारेकऱ्याला अटक, ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 12:55 AM