लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ग्राहकाला वाफाळत्या कॉफीच्या कपात मृत झुरळाचा आस्वाद घ्यायला लावणे मेसर्स कॉफी डे ग्लोबलला महागात पडले. आरोग्याच्या स्वच्छतेविषयी निष्काळजीपणा केल्याबाबत अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक मंचाने कॉफी डे ग्लोबलला नुकसानभरपाई म्हणून ग्राहकाला १३ हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.
प्राची संजय पाटील व रमेशचंद्र कुमावत यांच्या तक्रारीनुसार, ते दोघेही कुर्ला येथील फोनिक्स मार्केट सिटी येथील कॉफी डे ग्लोबलच्या उपाहारगृहात अल्पोपाहार व शीतपेयासाठी गेले. शीत कॉफीचा शेवटचा घोट घेत असताना त्यांना कपात मृत झुरळ आढळले. ते पाहून एका तक्रारदाराला मळमळ होऊ लागली व अंगात हुडहुडी भरली. त्यांनी उपाहारगृहाच्या काउंटरवर तक्रार केली. मात्र, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
त्यानंतर ई-मेलद्वारे तक्रार करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. मानसिक व शारीरिक त्रासापोटी पाच लाख तर तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रुपये देण्याचा आदेश कॉफी डेला द्यावा, अशी विनंती केली. याबाबत कॉफी डे ग्लोबल यांनी लेखी युक्तिवाद न्यायालयात सादर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार वकील आहेत. कायद्याचा धाक दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बिलामध्ये शीत चहाचा उल्लेख आहे आणि तक्रारीत त्यांनी शीत कॉफी म्हटले आहे. तसेच तक्रारदार नवी मुंबई येथे राहतात आणि त्या कुर्ला येथे येणे अशक्य आहे. तक्रारदारांनी स्वत:च मृत झुरळ कपामध्ये टाकले.
मात्र, मंचाने हा युक्तिवाद फेटाळला. ‘तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या उपाहारगृहात शीत कॉफी आणि चहा यांचा दर एकच आहे. त्यामुळे ग्राहकाला चहाच्या बदल्यात कॉफी घेण्याची मुभा आहे. तक्रारदाराने स्वत:च झुरळ टाकले, हे शपथपत्रावर म्हटलेले नाही. उपाहारगृहात आरोग्यासंबंधी स्वच्छतेचे नियम कसे पाळले जातात, याबाबतचे कागदोपत्री पुरावे सादर केले नाहीत,’ असे म्हणत ग्राहक मंचाने कॉफी डेचा युक्तिवाद फेटाळला.
त्यानंतर कॉफी डे ग्लोबलला तक्रारदराला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी १० हजार रुपये व तक्रारीसाठी आलेला खर्च म्हणून तीन हजार रुपये असे एकूण १३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.‘केवळ आरोप, शपथपत्र नाहीच’तक्रारदारांनी स्वत:च मेलेले झुरळ कपात टाकून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला, असा केवळ आरोप आहे. तसे त्यांनी शपथपत्रावर म्हटले नाही; किंवा पुरावाही सादर केला नाही, असे म्हणत ग्राहक मंचाने कॉफी डे ग्लोबलचा युक्तिवाद फेटाळला.