पुणे : पिंपरी-चिंचवड येथील एका सराईत गुन्हेगाराच्या टोळीतील गुन्हेगारांनी शिवाजीनगर न्यायालयाजवळील कामगार पुतळ्याजवळ हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी (दि. ७) दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पाहणी केली, मात्र, घटनास्थळी रिकामी काडतुसे किंवा गोळीबार झाल्याच्या खुणा आल्या नसल्याची माहिती पोलिसांनी दिले. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार झाला असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षातुन शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी-चिंचवड येथील एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील गुन्हेगारांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली. संबंधित व्यक्तीला सोबत घेऊन पोलिसांनी कामगार पुतळा परिसरातील रहिवासी, स्टॉलधारक, रिक्षाचालक यांच्याकडे चौकशी केली. मात्र, गोळीबार झाल्याचे कोणी सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
याविषयी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर म्हणाले, गोळीबाराची माहिती मिळाल्यापासून शिवाजीनगर पोलिसांसह व गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. हवेत गोळीबार झाला, एवढीच माहिती उपलब्ध झाली आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करत आहोत.'