पुणे : खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या लांडगे वस्ती येथील राजू चंदू सोनवणे याच्या घरावर तीन अज्ञात व्यक्तींनी काल रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात खंडू लक्ष्मण चव्हाण ( वय 22) याच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यातून राजू सोनवणे, त्याची पत्नी व दोन लहान मुले थोडक्यात बचावले आहेत. तीन हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलांमधून तब्बल पंधरा राऊंड फायर केले.ही संपूर्ण घटना घराच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला व सध्या फरार असलेला सराईत गुन्हेगार चेतन लिमन याने त्याच्या हस्तकाच्या फोनवरून राजू सोनवणे यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. राजू सोनवणे हा अवैध व्यवसायिक असून छुप्या पद्धतीने गांजा व ताडीची विक्री करतो. यापूवीर्ही चेतन याने राजू सोनवणे याला धमकावून वीस हजार रुपये घेतले होते. यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याने दोन दिवसांमध्ये तुझा मर्डर करतो अशी धमकी फोनवरून चेतनने याने सोनवणे यांना दिली होती. त्यानुसार रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलाने घराच्या दरवाजावर व खिडकीवर तब्बल पंधरा राऊंड फायर केले. यामध्ये राजू सोनवणे याच्याकडे काम करणाऱ्या खंडू लक्ष्मण चव्हाण याच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून धायरी येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील व हवेली उपविभागाच्या पोलीस उपअधिक्षीका सई भोरे-पाटील यांना तातडीने घटनास्थळाला भेट देण्यास सांगितले आहे. चेतन लिमन व इतर अज्ञात पाच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन व हवेली पोलिस स्टेशनचे एक अशी एकूण तीन पथके रवाना करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम हे करत आहेत. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खडकवासला येथे घरावर अंदाधुंद गोळीबार; एकाची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 6:10 PM
तीन हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलांमधून तब्बल पंधरा राऊंड फायर
ठळक मुद्दे 50 हजार रुपयांची केली होती मागणी संपूर्ण घटना घराच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद