मुंबई -ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अंधेरीतील भंगारचा व्यापारी असलम खान (वय - 58) यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पर्दाफाश करण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या गोळीबाराची सुपारी देणारा व्यापारी आणि मुख्य आरोपी सिकंदरजान सय्यद सिकंदर बिपल्ला शहा याला शनिवारी पोलिसांनीअटक केली. त्यानंतर शहाच्या अधिक चौकशीत पोलिसांनी इंदोर येथून फिरोझ खानला अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून सुपारी देऊन हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माहिती दिली.
असलमचा पुतण्या आणि गुजरातमधील रशीद नावाचा व्यक्ती हे दोघे पार्टनरशीपमध्ये जुहूच्या एक हॉटेल सुरु करणार होते. मात्र, याआधी असलमच्या पुतण्याचे भायखळ्यात राहणाऱ्या सिकंदर याच्याकडून काही रक्कम व्याजावर घेतली होती. रक्कमेचे व्याज जवळपास २० लाख इतके देणं होतं. त्यामुळे सिकंदरने पुतण्याकडे २० लाख देण्याचा तगादा लावला होता. मात्र, या आर्थिक व्यवहारात असलमने मध्यस्थी करत व्याजाची रक्कम जास्त असून नाही देणार असं सिकंदरला धमकावलं होतं. याचा बदला घेण्यासाठी सिकंदराने असलमवर गोळीबार करण्यासाठी सुपारी दिली होती असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.
असलम खान यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी येथील मरोळ चर्चजवळील जार्ज सेंटर अपार्टमेंटच्या एक विंगमधील रुम क्रमांक 401 मध्ये राहतात. शनिवारी 3 ऑगस्टला ते कामावरुन रात्री सव्वाबारा वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी आले होते. कार पार्क केल्यानंतर ते घराच्या दिशेने जात होते. यावेळी तिथे बाईकवरुन दोन तरुण आले, या दोघांनी त्यांच्या तोंडावर रुमाल बांधले होते, काही कळण्यापूर्वीच त्यापैकी एका तरुणाने त्यांच्यावर गोळीबार केला होता. ही गोळी पोटात घुसल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अलीकडेच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.