गांजा विक्रीसाठी पहिल्यांदाच मुंबईत आला अन् अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:43 AM2019-07-08T06:43:44+5:302019-07-08T06:44:15+5:30
अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; दक्षिणेतील कनेक्शन उघड
मुंबई : विशाखापटण्णम येथून हैद्राबाद मार्गे मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात १० हजार किलो गांजाची तस्करी करणारा तस्कराचे पहिल्यांदाच मुंबईत येऊन तस्करी करण्याचे धाडस अंगलट आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत या तस्कराला अटक करण्यात आली. गंगम सुधाकर रेड्डी (३०) असे त्याचे नाव असून, त्याला १८० किलोच्या गांजासह अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे, तसेच त्याच्यासह साथीदार अकुला मधू व्यंकटेश्वरलू (३३) यालाही अटक करण्यात आली आहे.
मानखुर्द सिग्नल जवळून गांजा तस्कर कारमधून जाणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला मिळाली. त्यानुसार, त्यांनी पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून शनिवारी रेड्डी व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. त्याच्या कारमधून १८० किलोचा गांजा मिळून आला. त्याची किंमत ३६ लाख आहे. अटक केलेले दोनही आरोपी तेलंगणाचे रहिवासी आहेत. यातील रेड्डी हा तस्करीचा मास्टरमाइंड आहे. त्याने आतापर्यंत विशाखापटण्णम येथून हैद्राबाद मार्गे मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यातील गांजा विक्रेत्यांना १० हजार किलो गांजाचे वितरण केल्याची माहिती चौकशीत उघड झाली. त्याची किंमत २० कोटी इतकी असून, पण यात व्यवहारात कधीच स्वत: पुढे येत नसे, असे पोलिसांनी सांगितले.
मोठ्या व्यवहारासाठी आला होता मुंबईत
रेड्डी हा विशाखापटण्णम येथून या गांजा आणायचा आणि हैद्राबाद येथे डिलिव्हरी बॉयला बोलावून त्यांच्याकडे गांजा देत असे. अटकेच्या भीतीने हैद्राबादमधून पुढे येणे तो टाळत होता. यंदा पहिल्यांदाच मुंबईत मोठ्या व्यवहारासाठी स्वत:च्या कारने तो आला आणि पोलिसाने त्याला अटक केली. त्याच्याकडे तपास पथक अधिक तपास करत आहेत. त्याच्या तपासातून गांजा तस्करांचे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.