मुंबई : कस्टम अधिकारी असल्याचे भासवून थायलंडच्या नागरिकाला लुबाडण्यात आले. सांताक्रुझ परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एका वैमानिकासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली.जुहू परिसरात रोचापॅन तोमिशा हा थायलंडचा नागरिक राहतो. त्याच परिसरात थोड्या अंतरावर वैमानिक सतीश चौहान (२६) राहतो. तो थायलँडमध्ये वैमानिक म्हणून काम करत होता. मात्र कोरोनामुळे त्याला नोकरी गमवावी लागली आणि तो मुंबई परतला. थायलँडमध्ये असताना बोगस कस्टम अधिकारी बनून त्याची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे तोमिशाला लुबाडून त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने चाैहानने कट रचला. तोमिशाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ११ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी अडीचच्यासुमारास कस्टम अधिकारी असल्याचे सांगत चाैघेजण त्याच्या घरात शिरले. त्यातल्या दोघांनी त्याचे पाकीट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्याकडून घेतल्या, तर अन्य दोघे व्हिडीओ शूट करू लागले. त्यानंतर ते मोटारसायकलवरून फरार झाले.
३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केली पडताळणी तोमिशा पोलीस ठाण्यात गेला, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी जुहू, डी. एन. नगर तसेच वर्सोव्यातील ३५ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहिले. ज्यात आरोपी कैद झाले हाेते. तपासाअंती त्यांनी चौघांना अटक केली. चाैघेही एका बारमध्ये बाऊन्सर म्हणून काम करत हाेते. त्यांच्या चौकशीत चौहानचे नाव उघडकीस आल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.