चिचघाट जंगलात पाच लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 09:53 PM2021-01-08T21:53:51+5:302021-01-08T21:54:14+5:30
Crime News : जंगलात तिघांकडून मोठ्याप्रमाणात दारूचे गाळप केले जात होते. त्या तीन आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली.
यवतमाळ : तालुक्यातील चिचघाट जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या दारूचे गाळप होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यावरून विशेष पोलीस पथकाने गोपनीय रीत्या धाड टाकून चार लाख ८६ हजार ५०० रुपयाची निव्वळ दारू जप्त केली. जंगलात तिघांकडून मोठ्याप्रमाणात दारूचे गाळप केले जात होते. त्या तीन आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली.
जगदीश अगलदरे रा. वारद, श्रीकांत कोडापे रा. चिंचघाट, संजय जीवने रा. भोसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी अवैध दारू गाळपाचा कारखानाच चापडोह व चिचघाट जंगल शिवारात उभा केला होता. तब्बल १८५ पिपे व २२ ड्रम इतकी दारू व मोहमाचाचा सडवा पोलिसांनी जप्त केला. या तीनही आरेापीविरुद्ध वडगाव जंगल पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज केदारे, सहायक निरीक्षक गजानन पाटेकर, सचिन घुगे, शिपाई वाघमारे, पवार, राठोड, मस्के, चव्हाण, सातपैसे, कसार, गवई, सहारे, साबळे यांनी केली.