मुंबई - मुंबईपोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गोरेगाव येथील रुळांजवळील झोपड्यांमध्ये सोमवारी धाड टाकून पाच महिलांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेसात किलो गांजा पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत दीड लाख इतकी आहे. रेल्वेलगत असलेल्या झोपड्यांमध्ये रेल्वे रूळातून तसेच विविध ठिकाणांहून अनेकजण अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगर झोपडपट्टीत कांदिवली युनिटचे पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या पथकाने महिला अंमलदाराच्या मोठ्या फौजफाट्यासह सोमवारी धड टाकली. हि संपूर्ण वस्ती पिंजून काढत या वस्तीमध्ये पाच महिला अमली पदार्थ विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी शशिकला शिंदे (वय - ५५), मरिअम्मा ऊर्फ कमाली शिंदे (वय - ३६), पार्वती धनगर (वय - ३५), लसदमेरि अर्जुन (वय - ३७), कमला कपूर (वय - ५५) या पाच महिलांना अटक केली. त्यांच्याकडे सात किलो तीनशे ग्रॅम गांजाचा साठा सापडला.
गोरेगाव येथील या वस्तीच्या जवळपास कोर्पोरेट कार्यालये आणि काही कॉलेज आहेत. यातील तरुण झोपडपट्टीत जाऊन अमली पदार्थ घेत नाहीत. याच पट्ट्यात राहणारे तरुण या महिलांकडून अमली पदार्थ खरेदी करतात आणि दुप्पट दराने या कार्यालयातील नोकरदारांना आणि कॉलेज तरुणांना विकतात. पोलिस या तरुणांचा शोध घेत आहेत.