‘साहब जिंदगी मे कुछ करना था’ असे म्हणत केल्या चार हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 01:50 AM2019-02-15T01:50:56+5:302019-02-15T01:51:35+5:30
तृतीयपंथी असल्याचे समजताच कुटुंबीयांनी झिडकारले. वयाच्या १२ व्या वर्षी कर्नाटकातून मुंबई गाठली. मुंबईतला आधार हरपल्यानंतर गर्दुल्ल्यांच्या वासनेचा शिकार झाला.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : तृतीयपंथी असल्याचे समजताच कुटुंबीयांनी झिडकारले. वयाच्या १२ व्या वर्षी कर्नाटकातून मुंबई गाठली. मुंबईतला आधार हरपल्यानंतर गर्दुल्ल्यांच्या वासनेचा शिकार झाला. पुढे चुकीच्या संगतीत, ‘ये तो मच्छर भी नही मार सकता’ असे मित्रांकडून हीणवने सुरू झाले. चार वर्षांपासून संबंध जुळलेल्या जोडीदारासोबत तो राहू लागला. त्याच्याच सांगण्यावरून त्याने पहिली हत्या केली. त्यापाठोपाठ एक नाही, तर तब्बल चार हत्या केल्या. विठ्ठल बजंत्री असे या आरोपीचे नाव आहे.
वांद्रे पोलिसांनी गुलबर्गामधून अटक केलेल्या बजंत्रीच्या चौकशीतून हत्याकांडाचा हा थरार उलगडला. ‘जिंदगी मे कुछ करना था.. म्हणूनच हा मार्ग निवडल्याची कबुली बजंत्रीने दिल्याने तपास पथकही थक्क झाले.
तृतीयपंथी म्हणून हीणवत असल्याने पार्टनर सूरज काळू याची विठ्ठलने ४ जानेवारी रोजी वांद्रे भागात हत्या केली. या हत्येप्रकरणी १९ जानेवारीला त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याच्या अधिक तपासात त्याने केलेल्या हत्याकांडाचा उलगडा झाला. मूळचा कर्नाटकचा रहिवासी असलेल्या विठ्ठलला तृतीयपंथी असल्याने १ वर्षाचा असताना, त्याच्या वडिलांनी मुंबई सेंट्रल येथील आजीकडे सोडले. ६ वर्षांनी पुन्हा कर्नाटकला नेले. तेथे मिळणाऱ्या तुच्छ भावनेमुळे १२ व्या वर्षी तो कर्नाटकमधून पळून आजीकडे आला. मात्र आजीचे निधन झाल्याने तो तेथेच पदपथावर गर्दुल्ल्यांसोबत राहू लागला. त्यांच्या अनैसर्गिक अत्याचाराचा शिकार झाला. वांद्रे ते माहीम दरम्यानच त्याचे आयुष्य होते. दारूसह नशेचे व्यसन जडलेल्या बजंत्रीला त्याचे मित्र नामर्द म्हणायचे. त्याच्या जीवनाला अर्थ नसल्याचे सांगत हीणवायचे. त्यामुळे त्याचा राग वाढत गेला. याच दरम्यान चार वर्षांपूर्वी त्याची सूरजशी ओळख झाली. तो त्याच्यासोबत राहू लागला. सूरजच्या सांगण्यावरून त्याने माहिममध्ये जुमाराची पहिली हत्या केली.
पहिली हत्या पोलिसांच्या नजरेत न आल्याने, चिडवल्याच्या रागात त्याने वांद्रेमध्ये दुसरी हत्या केली. तेथून त्याने कर्नाटकात बहिणीकडे धाव घेतली. तेथे बहिणीला त्रास देणाºया भावोजींची हत्या केली. तेथून जामिनावर बाहेर पडताच तो काळूकडे आला. घडलेला घटनाक्रम त्याला सांंगितला. पुढे काळूही त्याला हीणवू लागल्याने तसेच त्याने केलेल्या हत्यांची माहिती त्याला असल्याने त्याने काळूचाही काटा काढला.
या हत्याकांडामध्ये पदपथावर राहणारे गर्दुल्ले तसेच दारुड्यांचा समावेश असल्याने हत्याकांडाची नोंद अपमृत्यू म्हणून होत होती. मात्र काळूच्या मृत्यूनंतर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुरुवारी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. ठाण्यातही हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. मात्र ते कितपत खरे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अशी करायचा हत्या...
विठ्ठल हा सावजाला रात्री उशिरापर्यंत दारू पाजायचा. त्यानंतर, डोक्यात पेव्हर ब्लॉक अथवा दगड घालून काटा काढत असे. पोलीस मात्र दारूच्या नशेत जीव गेल्याचे समजत असल्याने, त्याचा गुन्हा समोर येत नव्हता.
हत्याकांडाचा थरार
३ आॅक्टोबर २०१७, माहिम - वांद्रे भागात जमुरा (२५) याची डोक्यात दगड घालून हत्या केली.
७ नोव्हेंबर २०१७, वांद्रे रिक्लमेशन - बेंगाली नावाच्या इसमाची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केली.
१२ नोव्हेंबर २०१७, कर्नाटक - बेंगालीच्या हत्येनंतर विठ्ठल कर्नाटकला बहिणीकडे गेला. बहिणीला त्रास देणाºया भावोजीची त्याने हत्या केली. १२ डिसेंबरला तो जामिनावर बाहेर आला.
४ जानेवारी २०१८, वांद्रे - तृतीयपंथीय असल्याचे सर्वांना सांगण्याची धमकी देणाºया काळूला विठ्ठलने मित्राच्या मदतीने निर्जनस्थळी नेले. तेथे दोघांनीही त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर त्याची हत्या केली. उत्तर प्रदेशमधून मित्र कनोजियालाही पोलिसांनी अटक केली.