पॅरिस - आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्यात प्रमुख भूमिका असलेले आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे (इंटरपोल) प्रमुख मेंग हाँगवेई गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असल्याने गुप्तचर यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्याअखेरीस इंटरपोलच्या फ्रान्समधील लीऑनमधील मुख्यालयातून मेंग चीनला जायला निघाले होते. मात्र, त्यानंतर ते कुठे गेले याचा थांगपत्ता लागला नाही. मात्र, मेंग यांचे नक्की अपहरण करण्यात आले आहे की ते बेपत्ता झाले याप्रकरणी फ्रान्स पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
192 देशांच्या कायदे अंमलबजावणी संस्थांशी संबंधित इंटरपोलच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले मेंग हे पहिलेच चिनी नेते आहेत. त्यांच्या गायब होण्याच्या वृत्तानंतर फ्रांसच्या पोलिसांनी त्यांचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली आहे. फ्रान्समधील इंटरपोलच्या लिऑन येथील मुख्यालयातून चीनकडे जाण्यासाठी निघालेले मेंग गेल्या आठवड्यापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रारही स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. युरोपिअन प्रशासनाच्या माहितीनुसार, मेंग 29 सप्टेंबरला युरोप सोडून चीनकडे जाण्यासाठी रवाना झाले. मात्र, दरम्यान ते फ्रान्समध्येही दिसून आले नाही. 2020 पर्यंत मेंग चीनमधील इंटरपोलच्या प्रमुखपदी कार्यरत राहणार आहेत. नोव्हेंबर 2016 साली इंटरपोलच्या चीनमधील प्रमुखपदी निवड होण्यापूर्वी मेंग हे चीन सरकारमधील सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री होते. या काळात त्यांनी गुप्तहेरांवर मोठा अंकुश राखला होता. मेंग हे चीनचे पहिले इंटरपोल अधिकारी राहिले आहेत.