बनावट दागिन्यांद्वारे फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:47 AM2019-10-05T01:47:33+5:302019-10-05T01:47:49+5:30

ठाणे : गोल्ड प्लेटेड दागिने खरे असल्याचे भासवून ते गहाण ठेवून ठाण्यातील सराफांची फसवणूक करणाऱ्या राकेश बागला (३४, रा. ...

Fraud by Fake Jewelry | बनावट दागिन्यांद्वारे फसवणूक

बनावट दागिन्यांद्वारे फसवणूक

googlenewsNext

ठाणे : गोल्ड प्लेटेड दागिने खरे असल्याचे भासवून ते गहाण ठेवून ठाण्यातील सराफांची फसवणूक करणाऱ्या राकेश बागला (३४, रा. मीरा रोड) आणि शिवकुमार सोनी (२०, रा. उत्तर प्रदेश) या भामट्यांना नुकतीच अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून चार सोनसाखळ्या, १२ अंगठ्या आणि सात कानांतील रिंगा असे बनावट दागिनेही हस्तगत केले आहेत.

ठाण्याच्या टॉवरनाका येथील पुनमिया आॅरनामेंट्सचे मालक राकेश पुनमिया यांच्या दुकानात १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका भामट्याने येऊन विक्रांत ठक्कर (रा. ठाणे, मार्केट विभाग) अशी आपली ओळख सांगितली. आपल्याकडे २९ ग्रॅमची हॉलमार्क चिन्ह असलेली सोन्याची रस्सी चेन असून ती गहाण ठेवून त्याबदल्यात काही पैसे हवे असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, पुनमिया यांच्याकडे त्याने ती सोनसाखळी दिली आणि त्यांच्याकडून ६० हजारांची रक्कम घेतली. पुनमिया यांनी त्या सोनसाखळीची पडताळणी केली असता, ही सोनसाखळी गोल्ड प्लेटेड असल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी सहायक पोलीस निरीक्षक अजित गोंधळी आणि उपनिरीक्षक अशोक सावंत यांचे पथक स्थापन केले. पुढे या पथकाने केलेल्या तपासात संबंधित भामट्याने दिलेले नाव आणि पत्ता खोटे आढळले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राकेश याला २८ सप्टेंबर रोजी मीरा रोड भागातून अटक केली. त्याने हे दागिने उत्तर प्रदेशातून आणल्याचीही कबुली दिली. त्याला बनावट दागिने पुरविणारा शिवकुमार सोनी (२०, रा. उत्तर प्रदेश) हा मीरा रोड येथे आला असता, त्यालाही अटक केली आहे. त्याच्याकडे ९१६ हॉलमार्क आणि २२ कॅरेट असा शिक्का असलेले गोल्ड प्लेटेड बनावट दागिनेही आढळले आहेत. तो इतरही सराफांची फसवणूक करण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याने यापूर्वी पुण्यातील भोसरी येथील धनराज निधी प्रा.लि., मुंबईतील नागपाडा तसेच पंजाब आदी ठिकाणच्या सराफ आणि ज्वेलर्सची फसवणूक केल्याचीही कबुली दिली आहे.

Web Title: Fraud by Fake Jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.