लोणी काळभोर : चुलत्याने पुतण्यास विश्वासाने जागेची कागदपत्रे दिली असता त्याने त्याचा साथीदार मित्राशी संगणमत करून, परस्पर कागदपत्रात फेरबदल केला. चुलत्याच्या जागी दुसराच इसम उभा करून स्वत:चे नावे बनावट बक्षीसपत्र तयार करून सदरची जमिन त्याचे नावे करून घेतली व फसवणूक केली म्हणून चुलत्याने पुतण्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वसंत शिवराम निंबरे ( वय ६४, रा. ताडीवाला रोड, कुमार गरीमा सोसायटी, पुणे ) यांनी दिलेल्या फियार्दी वरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राजेश शामराव निंबरे ( रा. येरावडा, पुणे ), भुपेंद्र अनिल जगताप व भरत बबन मोडक ( दोघे रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे ) या तिघांविरोधांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत निंबरे हे कुमार गरीमा सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे तिन भाऊ मयत झाले आहेत. त्यांचे मोठ्या भावाचा मुलगा राजेश हा आपल्या आईसमवेत येरावडा येथे रहातो. वसंत निंबरे यांनी लग्न केले नसल्याने त्यांना कोणीही वारसदार नाही. ते काम करून पुतण्यास मदत करतात. सन १९८४ साली त्यांनी वडकी गावच्या हद्दीत गट क्रमांक १२३६ मध्ये ५ आर हे क्षेत्र बबन हरिबा मोडक यांचेकडून खरेदीखताने विकत घेतले आहे. तेव्हापासून सदर क्षेत्रावर त्यांचा ताबा आहे. सन २०१७ मध्ये त्यांना काम होत नसल्याने सदर क्षेत्र विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. सन २०१७ मध्ये वसंत निंबरे यांनी पुतण्या राजेश यांस सदर जमिनीसाठी ग्राहक पाहण्यासाठी सांगितले व कागदपत्रे त्याचेकडे दिली. तोपर्यंत सदर जागेचा सातबारा त्यांचेच नावावर होता. मागील वर्षी २०१८ मध्ये त्यांना जमिनीसाठी ग्राहक मिळाले. त्यासाठी त्यांनी सातबारा काढला असता तो पुतण्या राजेश याचे नावावर निघाला. सदरबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांना हाकलून दिले. त्यानंतर त्यांनी सदर क्षेत्राची कागदपत्रे काढली असता त्यांना बक्षीसपत्राद्वारे सदर जागा राजेश याचे नावावर त्याचा मित्र भुपेंद्र जगताप याचे मदतीने झाली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी राजेश याला कधीही बक्षीसपत्र करून दिले नव्हते. तरीही बक्षीसपत्रात नमूद असलेली कागदपत्रे, खोटे पॅनकार्ड व स्वाक्षरी तसेच ते नसताना दुस-या इसमास त्यांचेजागी ऊभे करून खोटे बक्षीसपत्र तयार करून त्यांची फसवणूक करून जमिन स्वत:चे नावावर करून सदरची जमीन इतर व्यक्तींना विकत असल्याचे त्यांना समजले. दोन महिन्यांनंतर वसंत निंबरे हे पुन्हा आपल्या जमिनीवर गेले असता त्यांना भरत बबन मोडक याने तेथे येवू दिले नाही. व येथे तुझी जागा नाही. येथे परत यायचे नाही. अशी दमदाटी करून तेथून हाकलून दिले. म्हणून त्यांनी तिघांविरोधांत फसवणुक केली म्हणून तक्रार दिली आहे. पुढील तपास ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.
लोणी काळभोर येथे पुतण्याने जमिनीच्या कागदपत्रांत मित्रांशी संगनमत करुन केला फेरफार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 7:25 PM