लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसुचित जाती-जमाती विशेष भरती मोहिमेंतर्गत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचे अखेर बिंग फुटले. इंद्रजित केशव बोरकर (वय २९) नामक या उमेदवाराने स्वत:च्या नावावर दुसऱ्याकडून लेखी परीक्षेचा पेपर सोडवून घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.अनुसूचित जाती-जमाती विशेष भरती मोहिमेंतर्गत उपलेखा परीक्षक आणि कनिष्ठ लिपिक पदासाठी २३ फेब्रुवारी २०२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील ब्रह्माजीनगर, वाघापूर येथील रहिवासी इंद्रजित केशव बोरकर याला सर्वाधिक म्हणजेच १७८ गुण मिळाले. त्यामुळे त्याला ११ मार्चला मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थे(लेखा परीक्षण)च्या सिव्हिल लाईन्समधील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. यावेळी आरोपी बोरकर जात प्रमाणपत्र आणि डोमिसाईल सादर करू शकला नाही. त्याने लेखी परीक्षेच्या वेळी हजेरीपटावर केलेल्या स्वाक्षरीमध्ये आणि यावेळी केलेल्या स्वाक्षरीमध्ये बराच फरक आढळला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. परिणामी बोरकर गोंधळला आणि त्याने आपल्याऐवजी दुसऱ्यानेच लेखी परीक्षा दिल्याची कबुली दिली. त्याने सरकारची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सहनिबंधक सहकारी संस्थेतर्फे राजू दत्तू बिरले (वय ५१) यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
नोकरीसाठी सरकारी यंत्रणेची फसवणूक : लेखी परीक्षेत स्वत:ऐवजी दुसऱ्याला बसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:32 AM
अनुसुचित जाती-जमाती विशेष भरती मोहिमेंतर्गत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचे अखेर बिंग फुटले.
ठळक मुद्देसर्वात जास्त गुण मिळविणाऱ्यांची बनवाबनवी उघड