HP कंपनीची गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या नावाखाली १३ लाख ३५ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:12 PM2021-10-08T16:12:00+5:302021-10-08T16:14:08+5:30
Fraud Case : याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे: एचपी कंपनीची गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या नावाखाली कंपनीचा कथित संपर्क अधिकारी, देवाशिष परिआ याच्यासह तिघांनी ठाण्यातील एका ६० वर्षीय जेष्ठ नागरिकाची १३ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एचपी कंपनीचा कथित संपर्क अधिकारी, देवाशिष परिआ याने तसेच शशिकांत तिवारी आणि एका महिलेने कळवा येथील खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या जेष्ठ नागरिकाला गॅस एजन्सी मिळवून देण्याची बतावणी केली. त्याकरीता वेगवेगळी खोटी माहीतीही त्यांनी दिली. तसेच एलपीजी वितरक निवड व एचपी गॅस एजन्सी केंद सरकारच्या नावाची या जेष्ठ नागरिकास वेळोवेळी बनावट कागदपत्रे व्हाटसऐप मेसेज करून दिशाभुल केली. त्याद्वारे ३ नोव्हेंबर २०२० ते १२ जानेवारी २०२१ या कालावधीत कळवा येथील या जेष्ठ नागरिकाकडून १३ लाख ३५ हजारांची रक्कम आरटीजीएस द्वारे बँकेतून वळते करून फसवणूक केली. त्यानंतर बराच पाठपुरावा करूनही गॅस एजन्सी किंवा त्यापोटी घेतलेली रक्कमही या त्रिकुटाने परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या जेष्ठ नागरिकाने अखेर या प्रकरणी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा ६६ ड नुसार ७ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे. ,पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.