बनावट सोन्याचे बिस्किटं देऊन फसवणूक करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 09:50 PM2019-11-07T21:50:18+5:302019-11-07T21:51:14+5:30
कमी किंमतीत सोन्याची बिस्कीटे विकण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.
मुंबई - स्वस्त दरात सोने आणि बनावट सोन्याची बिस्किटं देण्याचे आमिष दाखवून सोने व्यापाऱ्याला गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. दीपक भीमराव शिंदे (33) असं अटक आरोपीचे असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार हे व्यवसायाने सोनार असून काही दिवसांपूर्वी ते सोने खरेदी करण्यासाठी झवेरी बाजार येथे गेले होते. त्यावेळी त्यांना यातील दोन आरोपींनी बाजार भावापेक्षा कमी दरात सोन्याची बिस्कीटे देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्या आरोपींनी तक्रारदाराल मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याकडे 30 हजार प्रति 10 ग्रॅम या दराने 2 हजार ग्रॅम सोने विक्री करत असल्याचे सांगून फिर्यादीस मीरा रोड येथे भेटण्यास बोलावले. त्याप्रमाणे तक्रारदार हे त्या दोन्ही आरोपींना भेटले असता त्यांनी फिर्यादीस सोन्याच्या 50 ग्रॅम वजनाचा बिस्कीटाचा नमुना दाखविला. तो नमुना तक्रारदाराने पडताळून पाहिला असता ते सोन्याचे असल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी दुपारी पुन्हा आरोपींनी फिर्यादींना मोबाईलवर संपर्क करून सोने खरेदीबाबत विचारणा केली.
त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचेकडे पूर्ण रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्या दोन्ही आरोपींनी फियरादीस दोन किलोग्रॅम सोने हे ते प्रति 10 ग्रॅमचे 20 हजार या दराने देण्यास तयार असल्याचे सांगून हा व्यवहार तात्काळ करण्याची गळ घातली. त्यानुसार तक्रारदार यातील आरोपी हे अतिशया कमी दरात सोन्याची विक्री करण्यास तयार झाल्याने त्यांच्याकडे असलेले सोने हे चोरीचे असावे किंवा ते फसवणूक करणार असल्याचा संशया आला. दरम्यान, या फसवेगिरीची माहिती गुणेच शाखेच्या कक्ष -12 चे पोलीस उपनिरिक्षक हरिष पोळ यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशावरून कक्ष - 12 च्या पथकाने गावदेवी मंदिर, दहिसर पूर्व योथे सापळा लावला.
त्यावेळी घाटला व्हिलेज. चेंबूर योथे राहणारा आरोपी दीपक शिंदे हा फियरादीस भेटण्यास आला. त्याने 10 सोन्याची बिस्कीटे फिर्यादीस दाखवली आणि त्यांना पैसे दाखविण्यास सांगितले. फिर्यादीने सोन्याचे बिस्कीटे पडताळून पाहिले असता ते सोने नसून सोनेरी रंगाचा मुलामा दिलेले अन्य धातूचे बिस्कीट असल्याचे त्यांचे लक्षात आले.त्यानंतर फिर्यादीने ठरल्याप्रमाणे पोलीस पथकास इशारा केल्यानंतर पोलिसांनी शिंदे याला घेराव घालून पकडले. 2 किलोग्रॅम वजनाची सोनेरी रंगाचा मुलामा दिलेले अन्य धातूची बिस्किटे जप्त करण्यात आली असून आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी शिंदे याच्याकडे केलेल्या चौकशी असता तो आणि त्याची टोळी ही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील सोने व्यापारी तसेच अन्य व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोन्याची बिस्कीटे विकण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.