जळगाव : फिरायला घेऊन गेलेल्या मैत्रिणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या गणेश कमलाकर सुर्वे (वय २०) व प्रकाश सुरेश नागपूरे (वय २२, दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी,जळगाव) या दोघांना न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी शनिवारी हा निकाल दिला.
या घटनेच्या संदर्भात माहिती अशी की, गणेश सुर्वे व पीडित १६ वर्षीय मुलगी दोघांची ओळख व मैत्री होती. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी गोशाळेकडे फिरायला जाण्याच्या बहाण्याने गणेश पीडितेला घेऊन गेला. सोबत त्याने त्याचा मित्र प्रकाश नागपुरे यालाही घेतले. शेतात फिरत असताना दोघांनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने त्यांच्या तावडीतून पळ काढला होता. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७६-ड, ३६३, ३६६ अ, २०१ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ नुसार तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ३(१) (डब्लु) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
वैद्यकिय अहवाल ठरला महत्वाचा पुरावा -या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन व उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी केला होता. तपास पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी यात एकूण १४ जणांच्या साक्षी घेतल्या. त्यात पीडित बालिका व वैद्यकिय अहवाल महत्वाचा पुरावा ठरला. त्या आधारावर दोघं आरोपींना दोषी धरण्यात आले. एकूण पाच कलमाखाली दोघांना २० वर्ष सश्रम कारावास व ४५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनीही यात सहकार्य केले. बचावपक्षातर्फे ॲड. सागर चित्रे व ॲड.मंजुळा मुंदडा यांनी बाजू मांडली.