मीरारोड - परदेशी महिलेशी फेसबुक वरुन केलेली मैत्री आणि पैसे व महागड्या वस्तुंच्या भेटीचे आमिष मीरा रोड मधील एका ज्येष्ठ नागरीकास तब्बल १९ लाखांना पडले. त्या कथीत परदेशी महिलेने तब्बल १९ लाखांना गंडवल्या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मीरारोडच्या पुनम सागर मार्गावरील श्रीपती इमारतीत राहणारे ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरीक ताराचंद पवार हे पश्चिम रेल्वेतुन मुख्य निरीक्षक पदा वरुन निवृत्त झाले आहेत. ते ६० वर्षीय पत्नी कलावती यांच्या सोबत राहतात. २०१७ साली त्यांनी आपले फेसबुक खाते उघडले होते. त्यावर त्यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल दिला होता.
२०१८ साली फेसबुक चाळताना त्यांनी जेनी विल्यम या नावाचे प्रोफाईल पाहिले. सदर महिलेने ती मुळची कॅनेडाची असुन अभियंता म्हणुन लंडन मध्ये नोकरीला असल्याचे नमुद केले होते. ताराचंद यांनी तीला मैत्रीची विनंती पाठवली असता तीने ती स्वकारली. ताराचंद व कथीत जेनी हे एकमेकां सोबत फेसबुक वर चॅट करु लागले.
पुढे जेनीने तीचा व्हॅट्स अॅप क्रमांक दिल्यावर दोघं त्यावरच चॅटिंग करु लागले. जेनी ही प्रमाचे संदेश तसेच स्वत:चे फोटो पाठवत असे. ती फोटो वरुन चाळीशीची वाटली. एक दिवस तीने तुमच्या साठी लॅपटॉप, घड्याळ व आय फोन या भेट वस्तु घेतल्या असुन सोबत ५० हजार पौंडचा धनादेश भेट म्हणुन देणार असल्याचे ताराचंद यांना सांगीतले. त्या वस्तुंचे फोटो तीने व्हॅट्स अॅपवर पाठवले. दोघां मध्ये व्हॉट्स अॅपवर सतत बोलणे होऊ लागले. ताराचंदना देखील तीने भुलवुन प्रेमात पाडले.
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ताराचंद यांना फोन आला आणि कुरीयर मधुन बोलत असल्याचे सांगुन तुमच्या साठी लॅपटॉप, घड्याळ, आय फोन व बंद पाकिटाचे पार्सल आल्याचे सांगण्यात आले. त्या पार्सलचे ३४ हजार रुपये भरावे लागतील असे कळवले. जेनीशी चर्चा केल्यावर त्यांनी कॅनेरा बँकेत ती रक्कम भरली. कुरीयर मधुन पुन्हा फोन आला व पाकिटात ५० हजार पौंडचा चेक असल्याने कस्टम अधिकारायास ९८ हजार शुल्क भरावे लागेल सांगण्यात आले. ते देखील त्यांनी भरले.
पुन्हा कुरीयर मधुन बोलत असल्याचे सांगुन पकडलेला धनादेश दिल्लीला मंत्रालयात पाठवला असुन पौंडला भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी २ लाख ८५ हजार भरावे लागतील असे सांगण्यात आले. ती रक्कम देखील त्यांनी भरली. त्यांना कुरीयर मार्फत रॉयल बँक आॅफ स्कॉटलँडचे एटीएम कार्ड तीने पाठवले. त्यातुन चार हजार काढण्यास सांगीतले असता ती त्यांनी काढले. एटीएम कार्डा मार्फत ५० हजार पौंडची रक्कम काढण्यासाठी ६ लाख भरावे लागतील सांगीतल्यावर ताराचंद यांनी ते देखील भरले. अशा प्रकारे विविध कारणं सांगुन ताराचंद यांच्या कडुन कथीत जेनी नावाच्या विदेशी महिलेने तब्बल १९ लाख १४ हजार ३०० रुपये उकळले.
परंतु भेटवस्तु आणि ५० हजार पौंड मात्र न मिळाल्याने अखेर फसवणुक झाल्याची खात्री पटल्यावर ताराचंद यांनी नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलींद बोरसे तपास करत आहेत. विशेष म्हणजे परदेशी महिला सांगणाराया जेनीने ताराचंद यांना पैसे मात्र भारतातीलच लोकांच्या नावे असलेल्या भारतिय बँकां मध्ये भरण्यास लावले होते.