गडचिंचले साधू हत्याकांड; आणखी ८९ जणांना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 01:50 AM2021-01-17T01:50:13+5:302021-01-17T07:21:57+5:30
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावातर्फे गैरसमजातून तिघांची हत्या करण्यात आली होती. गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत २५१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १०५ जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे.
कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू आणि त्यांचा चालक यांची जमावाने हत्या केली होती. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोपींची धरपकड करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी ८९ आरोपींचा शनिवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावातर्फे गैरसमजातून तिघांची हत्या करण्यात आली होती. गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत २५१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १०५ जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. शनिवारी ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बी. बहालकर यांनी ८९ आरोपींना जमीन मंजूर केला आहे.
गडचिंचले येथे चोर समजून १६ एप्रिल रोजी दोन साधू कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज व त्यांचा चालक नीलेश तेलवडे यांची रात्री जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते, तर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे व हवालदार नरेश यांना सेवेतून सक्तीची सेवानिवृत्त घेण्याची आणि इतर १५ पोलीस कर्मचारी यांच्यावर काही वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांनी केली होती.