पुणे : दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला़. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.आंबिल ओढा येथील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीत ही घटना घडली़. या प्रकरणी टेम्पोचालक नेताजी डांगे यांनी फिर्याद दिली आहे़. या तोडफोडीत १३ दुचाकी, १ मोटार आणि १ रिक्षाचे नुकसान झाले आहे़. शहरात रात्री अपरात्री किरकोळ कारणावरुन रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत़. प्रामुख्याने झोपडपट्टी व दाट वस्तीच्या परिसरात या घटना सातत्याने घडत आहेत़. दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीमध्ये बाहेर दुचाकी वाहने लावण्यात आल्या होत्या़. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास टोळक्याने लोखंडी रॉडने रस्त्याकडेच्या दुचाकी गाड्या फोडण्यास सुरुवात केली़ त्याचा आवाज ऐकून नेताजी डांगे हे बाहेर आले़. त्यांनी मुले गाड्यांची तोडफोड करीत असल्याचे पाहून आरडाओरडा केला़. तेव्हा लोक घरातून बाहेर आले़ हे पाहून हे चौघेही जण पळून गेले़. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून तोडफोड करणाऱ्या चौघांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला़. ही मुले परिसरातीलच असल्याचा पोलिसांचा संशय आहे़ दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत़.
पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीत टोळक्याने फोडल्या १५ गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 6:42 PM