लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. शालु गंटावार यांच्याविरोधात एसीबीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या चौकशीत या दाम्पत्याने २ कोटी ५२ लाख ८५ हजार ७६२ रुपयांची अतिरिक्त संपत्ती बाळगल्याची नोंद केली आहे. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.मागील काही दिवसापासून गंटावार दाम्पत्य आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत आहे. या मुद्यावरून महानगरपालिकेच्या सभागृहात गदारोळ सुद्धा झाला होता. फॉर्च्युन रेसिडेंसी येथे राहणाऱ्या प्रवीण गंटावार दाम्पत्याविरोधात २०१४ मध्ये एसीबीला तक्रार प्राप्त झाली होती. तेव्हापासून चौकशी सुरू असली तरी ठोस पुराव्याअभावी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. एसीबी अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी या प्रकरणाच्या तपासात मुळापासुन हात घातला. तेव्हापासून या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली होती २००७ मध्ये प्रवीण गंंटावार महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी (सर्जन) या पदावर कार्यरत होते. एसीबीने आपल्या चौकशीमध्ये त्यांच्या वेतनापासून प्राप्त झालेली कमाई, चल-अचल संपत्ती, संपत्तीच्या विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम, एफडीच्या माध्यमातून मिळालेली रक्कम या उत्पन्नाच्या स्रोताची चौकशी केली. यासोबतच आयकर, इंदिरा गांधी हास्पिटल, गांधीनगर, मनपा आरोग्य विभाग मेडिकल कॉलेज, बँक, उपनिबंधक कार्यालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ, मुलांच्या शिक्षणावर झालेला खर्च, गंटावार दाम्पत्याने स्थापन केलेल्या भागीदारी फार्म या सर्व बाबींची एसीबीने चौकशी केली.एसीबीने केलेल्या चौकशीत २ कोटी ५२ लाख ८५ हजार ७६२ रुपयांची संपत्ती उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. या दाम्पत्याने अधिकृत मार्गातून प्राप्त केलेल्या रकमेपेक्षा ४२.०६ टक्के ही रक्कम अधिक असल्याची नोंद एसीबीने घेतली. यामुळे उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम बाळगल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.एसीबीने आज गंटावार यांच्या संपत्तीसंदर्भात घराची आणि कार्यालयाची तलाशी घेतली. सायंकाळपर्यंत ही चौकशी सुरू होती. या चौकशीत मोठ्या प्रमाणात नगदी रक्कम आणि दागिने मिळाल्याची माहिती आहे. या दाम्पत्याच्या नावाने बँकेमध्ये लॉकरदेखील आहे. त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ऐवज असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. असे झाल्यास या काळ्या धनाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नागपुरातील गंटावार दाम्पत्याकडे २.५२ कोटींची अपसंपदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:37 PM
महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. शालु गंटावार यांच्याविरोधात एसीबीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देसहा वर्षानंतर एफआयआर : एसीबीच्या कारवाईमुळे मनपामध्ये खळबळ