गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: समलिंगी तरुणाशी मैत्री करण्यासाठी 'गे चॅट अँप' डाउनलोड करत अनोळखी मित्रांसोबत चॅटींग सुरू केलं. त्याच मित्राने २१ वर्षीय तरुणाला जंगलात नेऊन मारहाण केली आणि लुबाडले. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी बुधवारी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
जय रेड्डी आणि प्रथमेश मेश्री अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान ते आता मोबाईल चोरी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील फिर्यादी तरुण हा समलिंगी असून त्याने समलिंगी तरुणाशी मैत्री करण्यासाठी मोबाईलवर Grindr - gay chat app डाऊनलोड करून त्याद्वारे एका अनोळखी इसमाशी मैत्री करत चॅटींग करण्यास सुरुवात केली. मैत्री वाढल्यानंतर अनोळखी इसमाने फिर्यादिस बोरिवली पश्चिम येथील फॅक्टरी लेन येथे भेटण्यास बोलावले. त्यानुसार रात्री साडे आठच्या सुमारास फिर्यादी तरुण अनोळखी मित्राला भेटण्यास गेला. तेव्हा त्याला अनोळखी इसम हा त्याच्या स्कूटरवर बसवून आकाशवाणी जंगल परिसरात घेऊन गेला.
तेथे उपस्थित अजून एका साथीदार सोबत सदर इसमाने तरुणाला मारहाण करत दमदाटी केली व चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. आपण समलिंगी असल्याने बदनामी होईल या भीतीने पीडित तरुण सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार देण्यास गेला नाही. त्यानुसार बुधवारी बोरीवली पोलिसांनी त्याला बोलावून त्याचा जबाब नोंदवून घेत त्यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल केला. फिर्यादी सोबत चॅटिंग करून त्याला जंगलात नेणारा इसम जय रेड्डी होता व त्याच्या सोबत मिळून मारहाण करून चाकू दाखवून मोबाईल काढून घेणारा इसम हा प्रथमेश मेश्री होता असे त्याने पोलिसांना सांगितले. 'सध्या दोन्ही आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून आहेत. या गुन्ह्यात आम्ही न्यायालयाच्या परवानगीने त्यांचा ताबा घेऊन अटक करणार आहोत, अशी माहिती बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.